23 जुलै, 4 ऑगस्ट, 20 ऑगस्ट रोजी मोठे उधाण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकण किनारपट्टीवर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा व त्यात पौर्णिमेच्या मुहुर्तावर समुद्राला आलेल्या उधाणामुळे किनाऱयासह लगतच्या बंधाऱयाला तडाखा बसला आहे. रत्नागिरीतील मिऱया धुपप्रतिबंधक बंधाऱयाची यापूर्वीच वाताहात झाल्याने आता उधाणावेळी समुद्र ग्रामस्थांच्या आवारात घुसू लागल्याचे गंभीर चित्र आहे. येत्या 23 जुलै, 4 ऑगस्ट, 20 ऑगस्ट रोजी समुद्रात पुन्हा ‘हायटाईड’चा धोका कायम असल्याने उधाणाचे संकटाची भिती ग्रामस्थांना सतावू लागली आहे.
केरळच्या उत्तर भागापासून ते गुजरातपर्यंतच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कोकण किनारपट्टीभागात ठिकठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱयाबरोबरच मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे झाडे कोसळून घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडताना दिसत आहेत. रविवारी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्रालाही मोठे उधाण आलेले होते. यादिवशी ‘हायटाईड’ चा इशारा किनारपट्टीवर देण्यात आला होता. त्याचा फटका रत्नागिरीतील मिऱया किनारपट्टीवर बसला.
वेळोवेळी आलेले उधाण व समुद्राच्या प्रचंड लाटांच्या तडाख्याने किनारपट्टीच्या रक्षणासाठी घातलेला धुपप्रतिबंधक बंधाऱयांची वाताहात यापूर्वीच उडालेली आहे. मोठमोठी भगदाडे या बंधाऱयाला पडलेली आहेत. तर बंधाऱयाचे मोठमोठे बांधणी केलेले दगड ढासळून वाहून गेले आहेत. आता तर येणाऱया उधाणाचे प्रचंड पाणी येथील ग्रामस्थांच्या घर आवारात थेट घुसू लागलेले आहे. रविवारी 5 जूलै रोजी त्याचा प्रत्यय येथील ग्रामस्थांनी पुन्हा घेतला. अजस्त्र लाटांनी येथील किनारा उध्वस्त होऊ लागला आहे. सोमवार 6 जुलै रोजी देखील समुद्राचे उधाण कायम होते. मंजूर झालेला कोटय़ावधीचा धुपप्रतिबंधक बंधाऱयाचे काम मार्गी लागेपर्यंत येथील ग्रामस्थांचे होणारे नुकसान अटळ बाब बनली आहे. किनारपट्टी भागातील काळबादेवी, साखरतर, गावखडी, आरे, नेवरे, गणपतीपुळे, जयगड आदी भागात किनारपट्टीवर मोठमोठय़ा लाटा येऊन आदळत होत्या.
धुपप्रतिबंधक बंधारा वाहून जात आता समुद्राचे अतिक्रमण ग्रामस्थांच्या घर आवारापर्यंत होऊ लागल्याने गंभीर धोका निर्माण झाला आहे. 23 जुलै, त्यानंतर 4 ऑगस्ट, 20, 21 ऑगस्ट रोजी हवामान विभागाने ‘हायटाइड’ चा इशारा दिलेला आहे. यादिवशी समुद्राला येणाऱया भरतीमुळे 3 ते 4 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे मिऱया किनाऱयावर या उधाणाचा पुन्हा तडाखा बसणार आहे. किनाऱयावर असलेल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
पंधरामाड येथे मोठा दणका
सलग दुसऱया दिवशी सोमवारी समुद्राला आलेल्या मोठय़ा भरतीने पंधरामाड येथील धुप प्रतिबंधक बंधाऱयाचे पुन्हा मोठे नुकसान झाले आहे. लाटांच्या तडाख्याने पंधरामाड येथील बंधाऱयाचे दगड ढासळले. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची नारळबागायती समुद्र गिळंकृत करण्याचा धोका वाढला आहे. येथील मोरेवाडी येथे सावंत यांच्या बागेचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.









