विविध मार्गांवर बससेवा पूर्ववत : लांबपल्ल्यासाठी रात्रीही धावताहेत बसेस : ऑनलाईन तिकीट बुकिंगची व्यवस्था
प्रतिनिधी /बेळगाव
अनलॉक जारी करण्यात आल्याने अनेक क्षेत्रे खुली झाली आहेत. त्यामुळे बाहेर फिरणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिवहन मंडळाच्या स्थानिक बससेवेबरोबरच वातानुकूलित बससेवेलादेखील प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. वातानुकूलित बसेस लांब पल्ल्यासाठी विविध मार्गांवर धावत आहेत. दरम्यान रात्रीच्यावेळी लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे.
शासनाने अनलॉक जारी केल्याने बाजारपेठेसह मॉल, उद्योगधंदे, दुकाने व इतर सर्व व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रवाशांसह लांबपल्ल्याच्या प्रवाशांची ये-जा वाढली आहे. बसस्थानकातून ठाणे, बेंगळूर, म्हैसूर, बळ्ळारी, गोवा, बिदर, हैदराबाद आदी ठिकाणी वातानुकूलित बसेस धावत आहेत. शिवाय प्रवाशांच्या सोयीखातर बसस्थानकाच्या आवारात आगाऊ तिकीट आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. वातानुकूलित बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याने परिवहनच्या महसुलात वाढ होत आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्हा वगळता इतर ठिकाणी वातानुकूलित बससेवा सुरू आहे. दरम्यान प्रवाशांना आरटीपीसीआर किंवा कोरोनाचा पहिला डोस घेतलेले प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक आहे. प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यास इतर ठिकाणीही वातानुकूलित बससेवा पूर्ववत सुरू होणार आहे.
हिडकल डॅम, गोडचिनमलकी, गोकाकसाठी विशेष बस
जून महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे धबधबे पूर्णक्षमतेने प्रवाहित झाले आहेत. वर्षापर्यटनासाठी परिवहनतर्फे विशेष बस सुरू करण्यात आली आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून दर शनिवारी व रविवारी सकाळी 9 वाजता बस धावत आहे. हिडकल डॅम, गोडचिनमलकी व गोकाकला भेट देऊन पुन्हा सायंकाळी बस बेळगावात दाखल होणार आहे. वर्षापर्यटनाचा आनंद लुटणाऱया प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहनने केले आहे. दरम्यान बसस्थानकात ऑनलाईन तिकीट बुकिंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
बसस्थानकातून धावणाऱया वातानुकूलित बसेसचे वेळापत्रक-
| धावणाऱया बसेस | वेळ |
| बेळगाव-ठाणे | रात्री 8 वाजता |
| बेळगाव-बेंगळूर | दुपारी 12 व रात्री 8 वा. |
| बेळगाव-म्हैसूर | सायं. 7.30 वाजता |
| बेळगाव-बळ्ळारी | रात्री 10 वाजता |
| बेळगाव-बिदर | रात्री 9 वाजता |
| बेळगाव-गोवा | सकाळी 9.30 वाजता |
| बेळगाव-हैदराबाद | सायं. 7.30 वाजता |
| बेळगाव-नाशिक | सकाळी 7 वाजता |









