होन्नावर तालुक्यातील कासरगोड-टोंक येथे मच्छीमारी बांधवांची निदर्शने
प्रतिनिधी / कारवार
होन्नावर तालुक्यातील कासरगोड-टोंक येथे बृहत वाणिज्य बंदर उभारण्यासाठी देण्यात आलेली परवानगी 15 दिवसांच्या आत पाठीमागे घेण्यात आली नाही तर रास्ता रोको आणि मत्स्य व्यवसाय बंद ठेवण्याचा इशारा बुधवारी होन्नावर येथे हाती घेण्यात आलेल्या निदर्शने मोर्चावेळी देण्यात आला. मोर्चाचे आयोजन जिल्हय़ाच्या किनारपट्टीवरील मच्छीमारी बांधवांतर्फे केले होते. या आंदोलनाला राष्ट्रीय मच्छीमारी संघटनेने समर्थन दिले होते.
होन्नावर तालुक्यातील कासरगोड-टोंक येथे गेल्या 15 दिवसांपासून नियोजित बंदर प्रदेशाला जोडणाऱया रस्ता उभारणीच्या कार्याला सुरुवात केली आहे. या बंदराला स्थानिक मच्छीमारांकडून विरोध केला जात आहे. तरीसुद्धा विरोधाला डावलून रस्ता उभारणीचे कार्य सुरूच आहे. सरकार आपल्या मागणीची दखल घेत नाही, हे लक्षात येताच बुधवारी नियोजित बंदरस्थळी निदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर जिल्हय़ाच्या किनारपट्टीवरील तालुक्यातील मच्छीमारी बांधवांना मासेमारी बंद ठेऊन निदर्शने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नियोजित बंदरस्थळी हजारो मच्छीमारी बांधव जमा झाले. यामध्ये महिलांचा आणि मुलांचा भरणा अधिक होता. मोर्चात सहभागी झालेल्यांनी राज्य सरकार आणि हैदाबाद येथील त्या खासगी कंपनी विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
निदर्शने आंदोलनस्थळी राष्ट्रीय मच्छीमारी संघटनेचे यु. आर. सभापती, रामा मोगेर, कारवार जिल्हा मच्छीमारी संघटनेचे अध्यक्ष राजू तांडेल, भटकळचे माजी आमदार मंकटळू वैद्य, कुमठय़ाच्या माजी आमदार शारदा शेट्टी आदींनी उपस्थितांना उद्देशून समयोचित भाषणे केली. कासरगोड-टोंक येथील नियोजित बंदर उभारणीचा फटका मच्छीमारी समाजाला बसणार आहे. बंदरामुळे मच्छीमारी बांधवांना सुमारे 200 घरांना मुकावे लागणार आहे. बंदर उभारणीसाठी बंदराला जोडणारा रस्ता आणि रेल्वेमार्ग जोडण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जमिनीची गरज आहे. बंदर उभारणीसाठी परवानगी घेताना हेद्राबाद येथील त्या खासगी कंपनीने खोटारडेपणा केला आहे. संबंधित ग्रामपंचायत, सी. आर. झेडसह इतर खात्यांकडून रितसर परवानगी घेतलेली नाही. बंदरामुळे मच्छीमारी समाज रस्त्यावर फेकला जाणार आहे. याकरिता सरकारने कंपनीला दिलेली परवानगी 15 दिवसांच्या आत रद्द करावी. अन्यथा, रास्ता रोको व मत्स्य व्यवसाय बंद ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
राज्यपालांना निवेदन
त्यानंतर निदर्शने मोर्चा होन्नावर तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला आणि राज्यपालांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्री, मत्स्य व्यवसाय मंत्री, जिल्हा पालकमंत्री, यांना निवेदने देण्यात आली. निवेदनात जोपर्यंत बंदर उभारणीचे कार्य सुरू राहणार आहे, तितके दिवस आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. इतकेच नव्हे तर बंदराच्या विरोधातील आंदोलन भविष्यात उग्र करण्याचा इशाराही देण्यात आला.









