अब्दुल लाट / प्रतिनिधी
लॉकडाउन काळात गेली 3 महिने लोकांचा रोजगार बंद आहे. रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला असताना महावितरण कंपनीने अवाजवी आणि अवास्तव बिले आकारून भल्या मोठ्या रक्कमेची बिले पाठवली आहेत. ती तात्काळ भरणे सामान्य माणसाला अशक्य असून या कारणासाठी लाईट कनेक्शन कट करणे अन्यायकारक आहे. महावितरण ने बिले दुरुस्त करून त्यात 3 हप्ते पाडून द्यावेत आणि बिलाच्या कारणासाठी लाईट कनेक्शन तोडू नये अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा येथील शेतकरी विकास समितीने एका निवेदनाद्वारे महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील अकिवाटे यांना दिले आहे.
मागील 3 महिन्याची बिले रिडींगचे 3 भागात विभागणी करावी, लॉकडाउन काळातील कमर्शियल ग्राहकांचे स्थिर आकार रद्द करावा, प्रत्येक विभागात लॉक डाउन काळातील बिलांचे तक्रार निवारण्यासाठी अधिकारी नेमावा, दुरुस्त केलेली बिले 3 हप्ते पाडून देऊन भरून घ्यावीत, अडचणींचा काळ असल्याने लाईट बिले न भरणाऱ्या ग्राहकांची कनेक्शन तोडू नयेत या मागण्या निवेदनात केल्या असून यावर ताबडतोब कार्यवाही करावी अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष शेतकरी नेते विद्याधर कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. दशरथ काळे, प्रा.संजय परीट, सुभाष परीट, सुधीर सांगावे, आण्णासो नायकुडे, प्रमोद साळुंखे यांचा समावेश होता.