वापर वाढल्याचे देण्यात येतेय कारण : लॉकडाऊनमध्ये बिल भरण्यासाठीचे आर्थिक गणित कोलमडले
प्रतिनिधी / बेळगाव
या महिन्याचे वीजेचे बील हातात मिळताच अनेकांचे डोळे पांढरे होवू लागले आहेत. मागील महिन्यापेक्षा दुप्पट बिल या महिन्यात देण्यात आले आहेत. घरगुती वीजमीटरचे इतके बिल आल्याने सर्वसामान्यांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे चौकशी करायची म्हटल्यास बाहेर पडणे अशक्मय असल्याने वाढीव वीज बिलाबद्दल विचारणा करायची तरी कुणाकडे असा प्रश्न ग्राहक उपस्थित करीत
आहेत.
आधीच कोरोनामुळे मागील काही महिन्यापासून व्यवसाय थंडावलेला त्यात जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. यातच मे महिन्यात देण्यात आलेली विजेचे बिल वाढल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. अव्वाच्या सव्वा बील आल्याने ते भरायचे कसे, असा प्रश्न ग्राहकांसमोर आहे. वीजेचा वापर वाढल्याने बील वाढल्याचे कर्मचारी सांगत असले तरी ते भरेपर्यंत सर्वसामान्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
उन्हाळा, लॉकडाऊनमुळे बिलात वाढ
मार्च महिन्यापासून बेळगाव परिसरात उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गारवा मिळण्यासाठी फॅन, एसी, कुलर, फ्रिज इतर उपकरणांना वापर वाढला आहे. त्याचसोबत लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ग्राहक घरीच असल्याने टिव्ही, मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उपकरणांना वापर वाढल्याने बिलात वाढ होत आहे. त्यामुळेच मार्च महिन्यापेक्षा एप्रिल महिन्याच्या बिलात वाढ झाल्याचे हेस्कॉम मिटर रिडरकडून सांगण्यात येत आहे.
दरवाढ नसतानाही बिलात वाढ
कर्नाटक राज्य विद्युत नियामक मंडळ (केईआरसी) च्या माध्यमातून प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात दरवाढ करण्यात येते. परंतु, राज्यात लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुका असल्याने दरवाढ तुर्तास पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर मे महिन्यात लॉकडाऊन सुरू असल्याने पुन्हा एकदा दरवाढ पुढे गेली आहे. अद्याप दरवाढ करण्यात आलेली नसतानाही वीजेच्या बिलात वाढ झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.









