माजी नगरसेवकांचे मनपा आयुक्तांना निवेदन :
प्रतिनिधी / बेळगाव
मागील पावसाळय़ात पूर परिस्थिती निर्माण होऊन त्यामध्ये अनेक घरांची पडझड झाली होती. त्यामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. आता कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने नागरिक घरात बंदिस्त आहेत. अशातच महानगरपालिकेने वाढीव घरपट्टी आकारण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे घरपट्टी वाढ रद्द करावी. अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवकांच्यावतीने महापालिका आयुक्तांना मंगळवारी देण्यात आले.
दर तीन वर्षांनी घरपट्टी वाढविली जाते. 2020-21 या वर्षांपासून घरपट्टी पंधरा टक्क्मयांनी वाढविण्यात आली आहे. रहिवासी इमारतींना 15 टक्के, व्यावसायिक इमारतींना 25 टक्के व खुल्या जागांची 25 टक्के करवाढ करण्यात आली आहे. प्रशासकीय कालावधीत वाढविण्यात आलेल्या घरपट्टीचा फटका शहरवासियांना बसला आहे. एकीकडे पूर परिस्थितीमध्ये असंख्य नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असतानाच कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या नागरिकांना आता वाढीव घरपट्टीचा फटका बसला आहे. 15 टक्के ऐवजी 25 टक्क्मयांप्रमाणे घरपट्टी वाढ करून वसूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरवासियावर झालेल्या अन्यायाविरोधात माजी नगरसेवक एकवटले असून मंगळवारी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची भेट घेऊन चर्चा केली. वाढीव घरपट्टीमुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अशातच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने 15 ऐवजी पंचवीस टक्के प्रमाणे घरपट्टीत वाढ करून चलन देण्यात येत आहे. तसेच कोरोनामुळे नागरिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे घरपट्टी वाढ रद्द करावी, अशी विनंती माजी महापौर सरिता पाटील यांनी माजी नगरसेवकांच्या व नागरिकांच्यावतीने केली.
तसेच विविध समस्याचे निवारण करण्याच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन तत्परतेने कार्यरत आहे. महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हे काम अचूकपणे करण्यात येत असल्याने माजी नगरसेवकांच्यावतीने महापालिका आयुक्तांचे अभिनंदन माजी नगरसेवक संघटनेचे सचिव दीपक वाघेला यांनी केले. तसेच मागीलवषी सारखी पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता नाला सफाईसह आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात, अशी विनंती केली.
यावेळी माजी महापौर सरिता पाटील, किरण सायनाक, विजय मोरे, मालोजी अष्टेकर, एन बी निर्वाणी, माजी महापौर कल्लाप्पा प्रधान, रेणू किल्लेकर, सतीश गौरगोंडा, ऍड. धनराज गवळी, माजी नगरसेवक पंढरी परब, दीपक वाघेला, सुधा भातकांडे, मेघा हळदणकर, वैशाली हुलजी, माया कडोलकर, विनायक गुंजटकर, सुनील बाळेकुंद्री, नीलिमा पावशे, रणजीत चव्हाण-पाटील, संभाजी चव्हाण, संजीव प्रभू, विजय भोसले, राजू बिर्जे, रमेश सोनटक्की, रतन मासेकर, राकेश पलंगे, फिरदोस दर्गा, अनुश्री देशपांडे आदींसह माजी नगरसेवक उपस्थित होते.
पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी
मालमत्ता करवाढ रद्द करण्यासाठी देण्यात आलेले निवेदन नगरविकास खात्याला पाठविण्यात येईल. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल. सॉफ्टवेअरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येईल. तसेच नाला स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले असून पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता आवश्यक खबरदारी घेण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी निवेदन स्वीकारून दिले.









