ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्त राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी येऊ नका असे आवाहन केले आहे.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेले पत्र मनसेचे सरचिटणीस सचिन देशपांडे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत.
पुढे ते म्हणाले, माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही, थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणे अजिबात उचित नाही. म्हणूनच पक्षातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना माझ्या सूचनावजा आदेश आहेत की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका.
तसेच कोरोनाच्या कठीण प्रसंगात महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणात पदरमोड करुन लोकांच्या मदतीला धावून जात आहे. अन्नधान्य वाटपापासून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणे आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देत आहे. याचा मला आनंद आणि अभिमान आहे.
हे कार्य करीत असतात कित्येक महाराष्ट्र सैनिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तरी देखील माझा महाराष्ट्र सैनिक मागे हटला नाही. तुमच्या या ताकदीला, शौर्याला माझा सलाम! अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
सगळं सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणार आहेच, तेव्हा तुमच्याशी भेट होईलच असे ही त्यांनी यावेळी सांगितले आहे.