कुपवाडमध्ये काँग्रेसतर्फे इंधन दरवाढ व महागाई विरोधात सायकल रॅली : मोदी सरकार विरोधात निदर्शने
प्रतिनिधी / कुपवाड
देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली इंधन दरवाढ व जीवनावश्यक वस्तुंच्या प्रचंड महागाईमुळे जनता हैराण झाली आहे, याला केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी मंगळवारी कुपवाडमध्ये बोलताना केला.
कुपवाड शहर काँग्रेसच्यावतीने इंधन दरवाढ व जीवनावश्यक वस्तुंच्या महागाई विरोधात मंगळवारी शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी पृथ्वीराज पाटील व नगरसेवक मंगेश चव्हाण बोलत होते. यावेळी काढण्यात आलेल्या सायकल रॅलीतुन मोदी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.
कुपवाडमधील सोसायटी चौकातुन सायकल रॅलीला सुरवात करण्यात आली. या रॅलीत शहराध्यक्ष सनी धोतरे, प्रा.अशोक रासकर, युवानेते कुलभूषण कर्णाळे, देशभूषण कर्णाळे, ज्येष्ठ नेते अरुण रुपनर, राहुल पाटील, सिकंदर मुल्ला यांसह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होते.