देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या एका दिवसात पन्नास हजार इतक्मया गतीने वाढत असताना, सोळा लाखाचा आकडा पार पडला असताना हा समूह संसर्ग आहे किंवा नाही या विषयावर खल करण्याची वेळ मागे पडली आहे. एका दिवसात 52 हजार रुग्ण आणि 800 मृत अशी उच्चांकी आकडेवारी गाठलेली असताना 10 लाखाहून अधिक लोक बरे झालेले आहेत हा देशाला एक मोठाच दिलासा आहे. पण म्हणून कोरोना धक्का देण्याचे थांबला आहे असे दिसत नाही. सर्वसामान्य माणसांशी तो क्रूरपणे वागतो आहेच, पण, मोठय़ांनाही त्याने ढील दिलेली नाही. महानायक अमिताभ बच्चन असोत किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असोत, कोणीही या कहरातून सुटलेला नाही. देशातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणारी, त्यांना जपणारी यंत्रणा असते. त्यामुळे हे लोक सुरक्षित असतात हा आजवरचा अनुभव कोरोनाने खोटा ठरविला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांपासून देशोदेशीच्या सत्ताधारी मंडळींनाही कोरोनाने अत्यंत छुप्या पद्धतीने गाठले. मात्र इतर लाखो नशीबवान लोकांप्रमाणेच हे नेतेही सुखरूपपणे या संकटातून बाहेर पडले आहेत, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. मात्र तरीही या मंडळींना कोरोनाची बाधा झाली कशी अशी शंका सर्वसामान्य माणसाला येणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर जसा छुप्या कोरोनाग्रस्ताचा धोका सर्वसामान्य माणसाला आहे तसा तो या महनीय व्यक्तिमत्त्वांनाही आहेच. या व्यक्तिमत्त्वांच्या कार्यालयापासून विविध ठिकाणच्या बैठकांपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारीवर्ग यांचा संपर्क असतो. या मंडळींचा संपर्कही अफाट असल्यामुळे यांच्या संपर्कातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या या महनीय व्यक्तीही कोरोनाग्रस्त होऊ शकतात. अर्थात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशातील सर्वात ताकदवान राज्यकर्त्यांपैकी एक असल्याने त्यांच्याविषयी चर्चा ही होणारच. मात्र स्वत:त कोरोनाची लक्षणे आढळल्याचे जाहीर करण्याचे मनोधैर्य बाळगणारे व्यक्तिमत्त्व या संकटावर मात करण्याची ताकद बाळगून असतेच. महानायक अमिताभप्रमाणेच अमित शहा हे सुद्धा या संकटातून बाहेर पडतील अशी सदिच्छा व्यक्त करूया. कोरोनाचे आव्हान हे बहुआयामी आहे. त्याचा संसर्ग अनेकांना छुप्या पद्धतीने झाला आहे. अनवधानाने संपर्कात येऊन बाधित होणाऱयांचीच सर्व संख्या आहे. जाणूनबुजून कोणी संपर्कात येणार नाही. पण, आता देशातील प्रत्येक व्यक्तीने या आव्हानाला फार म्हणजे फारच गांभिर्याने घेण्याची वेळ आलेली आहे. कोरोनावरील औषध दृष्टिपथात असले तरी ते तयार होऊन सर्वसामान्य भारतीयांच्या उपचारात रुजू व्हायला अद्याप बराच वेळ जाणार आहे. भारतीय सहयोगातून तयार झालेली लस स्वातंत्र्य दिनापर्यंत आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस असला तरी आव्हाने अनेक आहेत. डिसेंबर महिन्यापर्यंत देशाला दम धरावाच लागणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यालाच लस मिळेपर्यंत तारेवरची कसरत चालू ठेवावी लागेल असे म्हटले आहे. पण, ही कसरतही तितकीच भयानक आहे. तारेवरून उंचावर चालणाऱयांनाच त्याचे मोल माहीत असते. तोल सुटला तर प्राणांशी गाठ असते. त्यातही धोरणकर्त्यांना करावी लागणारी कसरत ही संपूर्ण समाजाच्या प्राणांशी जोडली गेलेली असल्याने महामारीवरील औषध शोधण्याचा मोठा दबाव जगभरातील राज्यकर्त्यांवर आहे. त्यातही अमेरिकेसारख्या देशाच्या राज्यकर्त्यांचे राजकीय आणि महासत्तेच्या वर्चस्वाचेही भवितव्य अवलंबून असल्याने त्यांची कसरत लाव्हारसावरची आहे. अशा काळात मग औषध कंपन्यांची स्पर्धा, त्यांचे गळेकापू राजकारण क्षम्य ठरून जाते. एका यशामागचे असे गुन्हे मग कौतुकाच्या महाकाव्यात परावर्तित होतात आणि पुढच्या आव्हानापर्यंत दबदबा राखून राहतात. जगावर गेल्या शतकभरात प्लेगपासून एड्स आणि इबोला पर्यंत अनंत आव्हाने आली. त्यात हजारोंचे बळी गेले. कोरोनानेही सात लाख लोकांचा जीव घेतला आहे. म्हणजेच सात लाख संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पूर्वीच्या शतकात दुसऱया महायुद्धात सहा कोटी वीस लाखांपेक्षा जास्त लोक मारले गेले. साम्राज्यवादाच्या वेडापायी इतके लोक मारले गेले तरीही रक्तपात थांबला नाही आणि कोरोनाच्या संकट काळातही साम्राज्यवाद औषधावरील हक्कातून डोकावतोच आहे. या सर्वांच्या खेळाच्या पलीकडे भयभीत समाज आहे. मृत्यूच्या तांडवाने जगातल्या कुठल्याही देशाची वाट सोडलेली नाही. मृत्यूचे भय हे सर्वव्यापी आहे. आधुनिक असो की पौराणिक कोणत्याही वैद्यक शास्त्रात कोरोनावर थेट औषध नाही. व्यक्तीच्या अंगी असलेली प्रतिकारशक्ती जागृत करण्यावर सर्व शास्त्र भर देत आहेत. प्रभावी औषध शोधण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ पाहिजे आहे. वैद्यक चाचपडत असताना एक अहवाल असाही आला की ज्याने लोकांना दिलासा दिला. मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱया लाखो लोकांना कोरोना होऊनही गेला, मात्र तो त्यांच्या ध्यानातही आला नाही. हा काही चमत्कार नाही. व्यक्तीच्या स्वत:च्या प्रतिकारशक्तीकडेच हा अहवालही बोट दाखवतो आहे. प्लाझ्मा थेरपीचा अवलंब अशाच विचारातून पुढे आलेला आहे. पण, तरीही हे सर्वच लोकांना उपयुक्त ठरणारे नाही. व्यक्तीच्या प्रकृतीनिहाय आव्हानेही वेगळी आहेत, त्याचेच आव्हान म्हणजे मृत्यूदर शून्यावर आणण्याचे उद्दीष्ट होय. ते साध्य होईल तेव्हा होईल. पण, काळजी घेणे प्रत्येक व्यक्तीच्या हाती आहे. प्रत्येक सण, समारंभापूर्वी ही जाणीव फार मोठय़ा वर्गाला करून द्यावी लागतेच आहे. आजपर्यंत झाले नाही, आता कुठला होतोय अशी वृत्ती बाळगली तर कोरोनाचा छुपा शत्रू घात करू शकतो. त्यासाठी सावधानता हीच सुरक्षा हे प्रत्येकाने स्वकियाला ध्यानात आणून दिलेच पाहिजे.
Previous Articleफेक आयडी
Next Article अर्सेनलकडे एफए फुटबॉल चषक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








