प्रतिनिधी/ वास्को
वाडे वास्कोतील सौदर्यीकरण करण्यात आलेल्या तळय़ाच्या देखभालीच्या प्रश्नावरून पुन्हा वादाला सुरवात झाली आहे. तळय़ाच्या देखभालीसाठी गोवा राज्य शहर विकास प्रधिकरण व मुरगाव नगरपालिका यांच्यामध्ये सामंजस्य करार होण्याच्या टप्प्यावर आलेला आहे. मात्र, तळय़ाचे मालक असलेल्या सेंट ऍड्रय़ू चर्च संस्थेने देखभालीची जबाबदारी आपल्याकडे देण्याची मागणी केलेली असून यासंबंधी चर्चने नागरिकांमधून सहय़ांची मोहिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदेशीर पाऊल उचलण्याचीही तयारी ठेवलेली आहे.
वाडे वास्कोतील महामार्गाच्या बाजुलाच असलेल्या तळय़ाचे सौदर्यीकरण होऊन आता दोन वर्षे उलटलेली आहेत. लोक या तळय़ाचा चांगल्या प्रकारे लाभ घेत आहेत. मात्र, देखभालीची प्रश्न अद्याप सुटलेला नाही. तळे व त्या तळय़ाभोवतीची जागा वास्कोतील सेंट ऍड्रय़ू चर्चची आहे. चर्चची मान्यता घेऊनच राज्य सरकारने जवळपास पंधरा कोटी खर्च करून या तळय़ाचा आधुनिक पध्दतीने विकास केलेला आहे. हा प्रकल्प गोवा राज्य शहर विकास प्राधिकरणाने साकारलेला आहे. त्यांच्यामार्फत साधारण दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. या एका चांगल्या प्रकल्पाच्या उद्घाटनासमयीच उद्घाटनाच्या नामफलकावर जमीन मालक असलेल्या संस्थेचे नाव नसल्याने वाद उफाळून आला होता. मात्र, तो सुप्तावस्थेत होता. या बरोबरच या सौदर्यीकरण करण्यात आलेल्या तळय़ाची देखभाल कोणी करावी याबाबतही प्रश्न निर्माण झाला होता. तोसुध्दा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे तळय़ाच्या देखभालीवर परीणाम झालेला असून या ठिकणी वीज दिव्यांचा प्रश्न तसेच मोडतोडीचे प्रकारही दिसून येत आहेत. त्यामुळे कुणी तरी या प्रकल्पाच्या देखभालीची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. मुरगाव पालिका आणि चर्चची फॅब्रीका संस्था ही जबाबदारी स्विकारण्यास तयार आहे. मात्र, यातही वाद निर्माण झालेला आहे. त्यामुळेच देखभालीचा प्रश्न रखडलेला आहे.
पालिका व प्राधिकरणामध्ये होणार सामंजस्य करार, मात्र, चर्चचा विरोध
राज्य सरकारने या तळय़ाच्या विकासासाठी जवळपास पंधरा कोटी खर्च केल्याने व या प्रकल्पाची योग्य पध्दतीने देखभालही व्हावी असे वाटत असल्याने शहर विकास प्राधिकरणाला तळय़ाच्या देखभालीची जबाबदारी मुरगाव पालिकेकडे देणे योग्य वाटत आहे. त्यांनी मागच्या दोन वर्षांपासून ही जबाबदारी पालिकेकडे देण्याची तयारी दर्शवलेली आहे. मात्र, चर्चचा सरकारच्या या निर्णयाला विरोध आहे. तळय़ाची जमीन आमची असल्याने देखभालीची जबाबदारी आमच्याकडे द्यावी अशी चर्च संस्थेची मागणी आहे. सध्या हा वाद टोकाला पोहोचला आहे. राज्य शहर विकास प्रधिकरणाने देखभालीसाठी मुरगाव पालिकेकडे करार करण्याची तयारी सुरू केलेली असून या सामंजस्य कराराचा मसुदा पालिकेकडे आला आहे. येत्या दोन दिवसांत या करारावर सहय़ा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चर्च संस्थेनेही विरोधासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या संस्थेच्या एका शिष्टमंडळाने या प्रश्नावर नुकतीच मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, या प्रश्नात नगराध्यक्ष हतबल आहेत.
प्रकल्पाच्या जमीन मालकालाच डावलले जात असल्याने चर्चने व्यक्त केली नाराजी
सेंट ऍड्रय़ू चर्चच्या संस्थेने यासंबंधी आपल्या सदस्यांची शनिवारी संध्याकाळी चर्चच्या हॉलमध्ये सभा घेतली. या सभेत सेंट ऍड्रय़ू चर्चचे फादर व फॅब्रीका संस्थेचे अध्यक्ष गाब्रीयाल डिकुन्हा यांनी वाडेच्या तळय़ासंबंधी निर्माण झालेल्या प्रश्नाची माहिती उपस्थित सदस्यांना दिली. या प्रश्नावर कोणकोणती पावले उचलता येतील यावरही यावेळी चर्चा झाली. सर्वप्रथम पालिका क्षेत्रातील प्रभागांमधून या प्रश्नावर सहय़ांची मोहिम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आवश्यकता भासल्यास कायदेशीर कारवाईचे पर्यायही चर्चच्या फॅब्रीकाने खुला ठेवला आहे. पालिका आणि गोवा राज्य शहर विकास प्राधिकरणामध्ये सामंजस्य करार होण्यापूर्वी सहय़ांची मोहिम सुरू करण्याचा चर्चचा प्रयत्न आहे. संबंधीत आमदार तसेच पालिका प्रशासकीय संचालकांकडे या हा प्रश्न मांडण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे. तळे सौदर्यीकरण प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी जमीन मालक असलेल्या चर्चलाच डावलण्यात आल्याची भावना या सभेत फादर गाब्रीयाल डिकुन्हा यांनी व्यक्त करून नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे आमचा हक्क नाकारण्यात आलेला आहे. देखभाल प्रश्नी मुरगाव पालिकेकडे सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतानाही चर्चला विश्वासात घेण्यात आलेले नाही या गोष्टीवर फादर गाब्रीयाल यांनी प्रकाश टाकला.
प्रकल्पाबाबत समाधान, मात्र, हक्क मिळायलाच हवा
सार्वजनिक वापरासाठी सरकारने एक चांगला प्रकल्प उभा केल्याचे स्पष्ट करून त्यांनी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा तसेच दाबोळीचे आमदार व मंत्री माविन गुदिन्हो या प्रकल्पासाठी कष्ट घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मात्र, प्रकल्पाच्या जमीनीचे मालक असलेल्या चर्चला तीचे अधिकार मिळायलाच हवे असे फादर गाब्रीयाल यांनी स्पष्ट केले.









