बालरुग्णांना औषधांच्या आवश्यकतेनुसार देण्याच्या पद्धतीचा राज्यात प्रथमच वापर
मुंबई / प्रतिनिधी
बाळाचे वजन तसेच आवश्यकतेनुसार औषध देण्याची पल्वरायझेशन पद्धत परळ येथील वाडिया बालरुग्णालयाने राज्यात प्रथमच सुरू केली आहे. यासाठी अन्न व औषध विभागाचीं मंजुरीही मिळविण्यात आली आहे.
रुग्ण लहान मुल असल्यास त्यांना औषध देताना काळजी घेतली जातेच. त्यामुळे बालरुग्णांच्या कलेनुसार त्यांना औषध देण्याची ही पद्धतीवर वाडिया रुग्णालयाने विचार केला. त्यानुसार, पल्वरायझेशन हा विभाग सुरू करण्यात आला असून सर्वच गरजू बालरुग्णांसाठी खुला आहे. रुग्णाच्या गरजेनुसार त्याला दिल्या जाणाऱया औषधाच्या डोसमध्ये कपात करण्याच्या प्रक्रियेला पल्वरायझेशन असे म्हणतात. यामध्ये औषधे कुटून किंवा त्यांचे चूर्ण करून त्यांचे अत्यंत बारीक कणांत रूपांतर केले जाते. रुग्णाच्या गरजेनुसार त्यांतून इच्छित डोस तयार केला जातो. हे तंत्र आवरण नसलेल्या (नॉनकोटेड) टॅब्लेट्ससाठी उपयुक्त ठरते. बालरुग्णांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यात मदत करण्याच्या उद्देशाने रुग्णालयाने किमान खर्चात पल्वरायझेशन विभाग सुरू करून मोठे पाऊल उचलले असल्याचे वाडिया रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
पूर्वी रुग्णाच्या नातेवाईकांना पल्वराईझ्ड म्हणजेच डोस कमी केलेली औषधे मिळवण्यासाठी बाहेरच्या पेंद्रांमध्ये 2 ते 3 दिवस रांगेत उभे राहावे लागत होते. औषधांना योग्य तो डोस मिळवण्यास विलंब लागल्याने रुग्णांना बाहेरून येणाऱया पल्वराईझ्ड औषधांची वाट बघत अधिक काळ रुग्णालयात दाखल राहावे लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने रुग्णालयातच हा विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वाडिया हॉस्पिटल्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. या विभागाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. एस. एस. प्रभू (वैद्यकीय संचालक), डॉ. सुहास पवार (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. अमजद खान पठाण (क्लिनिकल फार्माकॉलॉजी विभागाचे प्रमुख) आदी उपस्थित होते.
नवजात शिशूंना सूक्ष्म डोसेजची आवश्यकता भासते. हे डोसेज बाजारात उपलब्ध नसल्याने डॉक्टर डोसचा एक चतुर्थांश किंवा एक अष्टमांश भाग रुग्णाला देण्याचा सल्ला देतात. हे पालकांसाठी अशक्य होऊन बसते. मात्र, अर्हताप्राप्त फार्मासिस्ट्स स्वच्छ व निर्जंतुक जागेत पल्वरायझेशनच्या माध्यमातून औषधाच्या डोसमध्ये कपात करून देऊन शकतात. हे अद्ययावत तंत्रज्ञान असून वाडिया हे राज्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे.









