दोन्ही वाडियातील आजची ओपीडी 779,
थकीत वेतनासाठी संघर्ष सुरू राहणार : लाल बावटा
मुंबई / प्रतिनिधी
निधी अभावी झालेल्या आंदोलनामुळे वाडियातील रुग्णसेवेवर परिणाम झाला होता. मात्र, बुधवारी येथील रुग्णसेवा पूर्ववत झाल्याचे दिसून आले. येथील ओपीडी विभागात सकाळपासून गर्दी दिसून आली. बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात 515 रुग्णांनी ओपीडीमध्ये सेवा दिली. तर नौरोसजी वाडिया (प्रसूती) रुग्णालयात 264 रुग्णांना ओपीडी विभागात सेवा देण्यात आली. एकूण 779 रुग्णांना ओपीडी विभागात सेवा देण्यात आली असल्याचे वाडिया रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, निरंतर रुग्णेसेवेसाठी वाडिया रुग्णालय ओळखले जाते. रुग्णांसाठी ही सेवा पूर्ववत करण्यात आली असल्याची माहिती वाडिया रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. रुग्णालयात रुग्ण दाखल करुन घेण्यात येत नसून आगामी काळात यावर स्पष्टता रुग्णालयाकडून करण्यात येईल.
थकीत वेतनासाठी संघर्ष सुरू राहणार : वाडिया कर्मचाऱयांच्या सहाव्या वेतनाची थकबाकी 10 कोटी 10 लाख या रक्कमेबाबत काहीही निर्णय घेतला नसल्याने कर्मचाऱयांनी असमाधान व्यक्त केले. सहाव्या वेतनाप्रकरणी येत्या दोन ते तीन दिवसात आरोग्य मंत्री राजेश टोपे व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे लाल बावटा जनरल युनियनचे अध्यक्ष नाना परब यांनी सांगितले. राज्य सरकारकडून सहाव्या वेतनातील येणे बाकी असल्याचेही परब म्हणाले.
पालिका प्रशासनाने 22 कोटी व राज्य सरकारकडून 24 कोटी देण्याचे मंजूर केले असून ही रक्कम येत्या दोन ते तीन दिवसात मिळणार असल्याचे लाल बावटा जनरल युनियनचे अध्यक्ष नाना परब यांनी सांगितले. परंतु, याचबरोबर नौरोसजी वाडिया रुग्णालयातील कर्मचाऱयांची सहाव्या वेतन आयोगाची 10 कोटी 10 लाख रक्कमेबाबत व इतर प्रश्नांबाबत प्रशासनाने काहीही चर्चा केली नसल्याचे युनियनकडून सांगण्यात आले. ज्यामुळे सहाव्या वेतनाची थकीत रक्कम मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचे युनियनकडून सांगण्यात आले.









