प्रतिनिधी / वाठार
वाठार (किरोली) ता. कोरेगाव येथे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र पांडुरंग मिरोखे यांच्या बंद बंगल्याची डबल दरवाजाचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७७ हजार रुपये किंमतीच्या साडेतीन किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू, सी.को.कंपनीचे घड्याळ, किंमती कपडे- साड्या अज्ञात चोरट्यांने चोरून नेले. घटनेची नोंद रहिमतपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तपासकामी आलेल्या ठसे तज्ञांनी ठसे घेतले असून चोरीच्या घटनेला खूप दिवस लोटल्याने शोध कामी यश मिळाले नाही.
घटनास्थळाला कोरेगाव डीवायएसपी गणेश किंद्रे, स.पो.नि घनशाम बल्लाळ यांनी भेट दिली. सेवानिवृत्तीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र पांडुरंग मिरोखे वय ७२ यांनी वाठार (किरोली) येथे शेतीवाडी करण्यासाठी बंगला बांधला आहे. रामचंद्र मिरोखे हे काही कामास्तव दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता कराड येथे वास्तवास असणाऱ्या कुटुंबाकडे राहण्यास गेले होते ते जवळपास दीड महिन्यांनी आज बुधवार दि.१६ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान परतले. बंगल्यात गेले असता अज्ञात चोरट्यांनी वरुन आत शिरुन बंद घराचे कडी कोयंडा तोडून एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किंमतीच्या साडे तीन किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू, सी.को.कंपनीचे घड्याळ, किंमती कपडे- साड्या अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्या. डीवायएसपी गणेश किंद्रे यांनी तपासकामी स.पो.नि घनशाम बल्लाळ यांना महत्त्वपुर्ण सुचना दिल्या. तपास हवालदार मोहन कुलकर्णी करीत आहेत.
बंद बंगल्यात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी सर्व कपाटातील कपडे साड्या इतरस्त विखुरल्या होत्या. हाती किंमती वस्तू न लागल्याने धान्यांचे डबे तपासताना सर्वञ धान्य सांडले होते. फिर्यादीमध्ये रायफलचे राउंड चोरीला गेल्याचा उल्लेख करण्यात आला होता. माञ पोलिस तपासा दरम्यान घरातच रायफलचे राउंड सापडल्याने सेवानिवृत सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र मिरोखे यांनी समाधानाचा निश्वास सोडला.









