सातारा / प्रतिनिधी :
कारागृहात झालेल्या वादाच्या कारणावरून जामिनावर सुटल्यानंतर वाठार बुद्रुक, ता. खंडाळा गावच्या हद्दीत एकाचा खून करून त्याचा मृतदेह नीरा उजवा कॅनॉलमध्ये टाकल्याच्या घटनेतील दुसऱ्या संशयित ऋषिकेश दत्तात्रय पायगुडे (रा. कुडजे, ता. हवेली, जि. पुणे) याला नाशिक येथून जेरबंद करण्यात आले.
या प्रकरणातील अन्य एक संशयित वैभव सुभाष जगताप (वय २८ रा. पांगारे ता. पुरंदर, जि. पुणे) याला दोन दिवसापूर्वीच जेरबंद करण्यात यश आले होते.दि. ८ जून रोजी वाठार बुद्रुक, ता. खंडाळा गावच्या हद्दीत नीरा उजवा कॅनॉलमध्ये एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले होते. तपासाअंती तो मृतदेह मंगेश सुरेश पोमन (वय ३५ रा.पोमन नगर पिंपळे, ता. पुरंदर, जि. पुणे) याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. अनोळखी व्यक्तिंनी अज्ञात कारणावरून त्याचा खून करून त्याचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून देऊन पुरावा नाहीसा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लोणंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना लोणंद गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची नावे निष्पन्न करून त्यापैकी वैभव सुभाष जगताप याला शिताफीने अटक केली. याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, मंगेश पोमन, वैभव जगताप आणि ऋषिकेश पायगुडे हे तिघे येरवडा येथील कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यांच्यात वाद झाला होता. हे तिघेही जामिनावर सुटल्यानंतर मंगेश पोमण याचा दोघांनी खून केल्याची कबुली वैभव जगताप याने दिली आहे. दरम्यान, यातील दुसरा संशयित ऋषिकेश पायगुडे याचा पोलीस तपास घेत होते. त्याला नाशिकमधून जेरबंद करण्यात लोणंद पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले असून पथक त्याला घेऊन साताऱ्याकडे रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.









