प्रतिनिधी / कोल्हापूर
स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना क्लीष्ट गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून विशेष पदक देवून गौरविण्यात येते. असे हे विशेष पदक हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव या गावची कन्या ज्योती क्षीरसागर यांना नुकतेच जाहीर झाले असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशभरातील संवेदनशील गुन्ह्यामध्ये तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट अन्वेषण आणि तपास सिद्धतेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचे विशेष पदकाने गौरविण्यात येते. यावर्षी यामध्ये हातकणंगले तालुक्यातील ( जि. कोल्हापूर ) वाठार तर्फ वडगाव येथील ज्योती क्षीरसागर यांना हे पदक जाहीर झाले आहे. त्यांनी २०११ साली निवडणुकीच्या वादातून बीड जिल्ह्यातील आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाळू उर्फ रवींद्र खाकाल याचा जो निघृण खून झाला होता. या गुन्ह्यात क्षीरसागर यांनी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी करीत, १७ आरोपींना अटक केली. यासर्व आरोपीच्या विरोधी सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खून खटल्याच्या सुनावणीअंती न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या गंभीर आणि संवेदनशील गुन्हाचा तपास केल्याबाबत ज्योती क्षीरसागर यांना हे पद जाहीर झाले आहे. त्या सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची, तासगाव जि. सांगली येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.
Previous Articleशहराच्या उपनगरात कोरोनाचा झपाटय़ाने फैलाव
Next Article आता तालुका पातळीवरही खासगी इस्पितळात उपचार








