एकेकाची कल्पकता ऐकली किंवा वाचली की चकित व्हायला होतं. गोंदिया जिह्यातली एक बातमी परवा वाचली. एक शेतकरी पिकांच्या नासाडीमुळे जाम वैतागला होता. शेतात पीक उभं राहिलं की ते चोरांपासून जपावं लागतं. सीसीटीव्ही लावले तर चोरांवर लक्ष ठेवता येईल. पण रात्रीच्या वेळी मोकाट गुरं कोणत्याही शेतात धुडगूस घालतात. मोठय़ा शेताला कुंपण घालणं महागात जातं. शिवाय आडदांड गुरं कुंपण तोडू शकतात. स्वर्गीय हिंदी लेखक प्रेमचंद यांची एक कथा लहानपणी पाठ्यपुस्तकात होती. छान पीक आलेलं असतं. शेतकरी मनात इमले रचत असतो की हे धान्य बाजारात विकून पैसे येतील, कर्ज फिटेल, सणासुदीची खरेदी होईल, पुढच्या हंगामासाठी बियाणं घेता येईल, वगैरे. पण रात्री नीलगाय जातीच्या हरणांचा कळप शेतात शिरतो आणि उभं पीक फस्त करून जातो. सकाळी ते उद्ध्वस्त पीक पाहून शेतकरी हताश होतो, रडवेला होतो.
तर गोंदियामधली हकीकत. मोकाट गुरांपासून पिकांचं रक्षण करण्यासाठी या शेतकऱयाने एक यंत्र खरेदी केलं. त्या यंत्रात वाघाच्या डरकाळीचे आवाज ध्वनिमुद्रित केलेले होते. रात्री तो थोडय़ा थोडय़ा वेळाने यंत्र चालू करायचा. त्या आवाजाने मोकाट गुरं शेताकडं फिरकायची बंद पडली. पण दरम्यान गावातली सारी माणसं रात्री अपरात्री येणाऱया आवाजांनी घाबरली. त्यांनी परिसरात वाघ आल्याची वनखात्याकडे तक्रार केली. चौकशीअंती या यंत्राचे रहस्य उलगडले.
हे वाचून लहानपणी पुण्यातल्या प्राणिसंग्रहालयातला एक फलक आठवला. प्राणिसंग्रहालयात हत्ती, तरस, वाघ आणि सिंह होते. फलकावर दरपत्रक होते. त्यात प्रत्येक प्राण्याच्या वि÷sचा प्रति किलो दर लिहिलेला होता. ही वि÷ा कोण आणि कशासाठी विकत नेत असेल हा प्रश्न तेव्हा पडला होता. मोठेपणी त्याचे रहस्य उलगडले. अनेक शेतकरी ही वि÷ा नियमितपणे विकत घेतात आणि शेताच्या बांधावर टाकतात. रात्री तिचा वास पसरल्यावर हे प्राणी जवळपास आहेत अशी मोकाट गुरांची समजूत होते आणि मग ते शेताकडे फिरकत नाहीत.
इतका सोपा पारंपरिक उपाय उपलब्ध असताना गोंदियाचा शेतकरी शेतात वाघाच्या डरकाळीचे आवाज लावीत का बसला, कळायला मार्ग नाही. कदाचित असे केल्याने आपण आधुनिक शेतकरी होऊ असे तर त्याला वाटले नसेल नं.








