नाशिक \ ऑनलाईन टीम
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही वाघाशी मैत्री करायला तयार आहोत असं म्हणत शिवसेनेकडे मैत्रीसाठी हात पुढे केला होता. याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत पक्षबांधणीच्या निमित्ताने पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर मत मांडले.
चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा देखील संजय राऊत यांनी दिल्या. तसेच संजय राऊत यांनी यावेळी बोलताना विधानसभेतील जागा शंभरी पार करणार, असं म्हटलं. प्रत्येक पक्षाचं लक्ष असतं विधानसभेवर. आम्हालाही वाटतं की आमचा आकडा विधानसभेवर १०० च्या पार जावा. त्यासाठी आतापासून प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. तिन्ही पक्ष आपआपल्या पक्षासाठी काम करत आहेत. ते गरजेचं असल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी हे भाजप आणि देशाचे मोठे नेते आहेत. जे यश भाजपला प्राप्त झालं आहे ते त्यांच्या चेहऱ्यामुळेच आहे. पण पंतप्रधान हे देशाचे असतात, त्यांनी राजकीय प्रचार करु नये. कोणत्याही पक्षाचा प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान आहेत. फोटो वापरणे हे कार्यकर्त्यांवर असतं. बाळासाहेबांचा फोटो वापरला जातो, वाजपेयींचा वापरला जात होता. हे असं ठरवून होत नाही, लोकांच्या मनात तो नेता असतो, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी मालाड दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. मालाड इमारत दुर्घटना ही दुर्दैवी आहे. टीका करणाऱ्यांना करु द्या, स्वत: मुख्यमंत्री काल रस्त्यावर उतरले होते. सगळेच काल रस्त्यावर उतरले होते. टीका करणाऱ्यांना काय?, असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते ?
वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच, असं चंद्रकांत पाटील काल, बुधवारी पुण्यात म्हणाले होते.
Previous Articleस्टेशनरी दुकानमालकावर गुन्हा दाखल
Next Article साताऱ्यात स्टेशनरी दुकानमालकावर गुन्हा दाखल








