मोले येथील भगवान महावीर अभयारण्य क्षेत्रात पट्टेरी वाघाने दर्शन देऊन पुन्हा एकदा गोव्यात आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. तशी तीन वर्षांपूर्वी याच राखीव वनक्षेत्रात ‘वाघोबांची’ छबी वनखात्याने लावलेल्या कॅमेऱयात टिपली गेली होती. पश्चिम घाटातील मोले व म्हादई या दोन्ही अभयारण्यामध्ये पट्टेरी वाघांचा संचार व अधिवास असल्याचे आता कुणालाही नाकारता येणार नाही. तीन वर्षांपूर्वी सत्तरी तालुक्यात विषप्रयोगाने तीन बछडय़ांसह वाघिणीचा बळी घेण्याच्या घटनेने व्याघ्र संवर्धनाचा मुद्दा प्रामुख्याने पुढे आला होता.
मुळात आपल्या वनक्षेत्रात पट्टेरी वाघासारखा राष्ट्रीय प्राणी असणे, ही भीतीची नव्हे तर आनंदाची बाब म्हणावी लागेल. अशा प्राण्यांच्या अस्तित्त्वामुळेच जंगलाची समृद्धी व श्रीमंती अधोरेखीत होते. मुद्दा उरतो तो, असे जंगली प्राणी व मानवामधील संघर्ष टाळण्याचा. दोघांच्याही अभयासाठी सीमांकन आखून खबरदारी घेण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम आखणे शक्य आहे.
गोवा राज्यात सध्या व्याघ्र गणना सुरू आहे. केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत भारतीय वन्यजीव संस्था देहरादूनच्या सहकार्याने दर चार वर्षांनी ही मोहीम राबविली जाते. या सर्वेक्षणाच्यावेळी पट्टेरी वाघाचे दर्शन होणे, ही त्यात गुंतलेल्या अभ्यासकांना निश्चितच हुरुप आणेल. गोव्याविषयी ऐकून माहिती असलेल्यांना किंवा एक-दोनवेळा येथील समुद्र किनाऱयांना भेटी देऊन वरवर फिरलेल्या परराज्यातील लोकांना गोव्यात जंगल आहे, असे सांगितल्यास नवलच वाटते. पट्टेरी वाघांबद्दल सांगितल्यास अनेकांच्या भुवया उंचावतात. गोव्यात वाघांचा अधिवास आहे, हे आता वेगळे सांगावे लागणार नाही. वन्यजीव कायदा व प्राणी गणनेचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी गोव्यातील जंगलामध्ये हा राजस प्राणी होता. अनेक गावांतील व्याघ्र मंदिरेच त्याची साक्ष देतात. रानावनात वावर असलेले गावकरी व गुरा-वासरांना संरक्षण मिळावे, या भावनेतूनच कधीकाळी ही श्रद्धास्थाने तयार झाली असावीत.
कुठल्याही मौल्यवान गोष्टीचे संवर्धन करण्यासाठी केवळ कायदे करून व त्याची कडक अंमलबजावणी करून मूळ हेतू साध्य होईलच, असे नाही. त्यासाठी व्यापक लोकजागृती व लोक सहभाग आवश्यक असतो. देशात सध्या सर्वाधिक पट्टेरी वाघ मध्यप्रदेशमध्ये सापडतात. त्यांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठी संरक्षण, अधिवास, व्यवस्थापन, मानव-वन्यजीव संघर्षाचे व्यवस्थापन, लोकांचा सहभाग आणि नवनवे प्रयोग ही पंचसूत्री तेथील वन अधिकाऱयांनी यशस्वीपणे राबविली आहे. महत्त्वाचा भाग म्हणजे या राखीव वन्यक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या पुनर्वसनाचे कठीण काम त्यांनी अत्यंत कल्पक व कुशलतेने मार्गी लावले. या कार्यात मध्यप्रदेश सरकारने केंद्र सरकारच्या तुलनेत निम्म्याहून अधिक निधीचा वाटा उचलला. देशातील हे एक दखलपात्र उदाहरण वाघांच्या संवर्धनासाठी पुरेसे आहे.
पट्टेरी वाघांविषयी लोकांमध्ये भीतीदायक गैरसमजच अधिक आहेत. वाघाविषयी जाणून घ्यायचे असल्यास ‘जीम कॉर्बेट’ यांचे साहित्य आवर्जून वाचावे लागेल. उत्तराखंडातील ‘कुमांऊ’ आणि ‘गढवाल’ प्रदेशात त्यांनी शंभर वर्षांपूर्वी नरभक्षक वाघांच्या मागावर असताना केलेली निरीक्षणे व अभ्यास आजही तेवढाच उपयुक्त ठरतो. या अवलियाने केवळ नरभक्षक वाघांची शिकार केली नाही तर त्यातून या प्राण्याचा स्वभाव व तो नरभक्षक होण्यामागील कारणे शोधून जगासमोर मांडली. त्यांच्या या कार्यामुळेच 1957 साली भारतातील पहिल्या राष्ट्रीय अभयारण्याला कॉर्बेटचे नाव देण्यात आले. सुदैवाची गोष्ट म्हणजे गोव्यात पट्टेरी वाघ आहेत पण ते नरभक्षक असल्याची घटना अद्याप तरी उघडकीस आलेली नाही. वाघ का नरभक्षक बनतो, यामागील विविध कारणे कॉर्बेट यांच्या विपुल लेखनातून वाचायला मिळतात. वाघ व गोव्यात सर्रास आढळणाऱया बिबटय़ाबद्दल ते सांगतात. गोव्यात तर बिबटय़ाला वाघ संबोधणारेही अनेक लोक आहेत.
गोवा राज्यात एकूण सहा अभयारण्ये व एक राष्ट्रीय उद्यान आहे. वाघांसाठी त्यातील पश्चिम घाटात येणाऱया अभयारण्यात मर्यादित आकाराचे व्याघ्र क्षेत्र उभारण्याचा प्रस्ताव अद्याप धूळ खात पडला आहे. गोव्यातील संरक्षित जंगलांचे रुपांतर व्याघ्र क्षेत्रात करावे, यासाठी सरकारने तेथील रहिवासी असलेल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन व्याघ्र कृती दलाची स्थापना करून वाघांचे आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी आहे. विशेष म्हणजे म्हादई अभयारण्याची सीमा अधोरेखित करण्यासाठी 1999 साली अधिसूचना घोषित होऊनही गेल्या 22 वर्षांत त्याबाबत ठोस कारवाई झालेली नाही. या भागातील रहिवाशांना अद्याप त्यांचे हक्क मिळाले नाहीत किंवा पुनर्वसनही झालेले नाही. खाण व्यवसाय व इतर कारणांमुळे असे प्रकल्प राबविताना वन खात्यावर नेहमीच दबाव येतो. त्यामुळेच गोव्यातील जंगलामध्ये वाघांचे अस्तित्व कायम झाकून ठेवले जाते. आपले हितसंबंध जपण्यासाठी काही राजकारण्यांना अभयारण्ये किंवा व्याघ्र क्षेत्र नको आहे. त्यामुळे जनतेच्या आड उभे राहून त्या विरोधात रेटा लावला जातो. त्यात बळी जातो तो वन्य प्राण्यांचा व पूर्वापार वास्तव्य करून राहणाऱया तेथील नागरिकांचा.
वाघाला क्रूर व रक्तपिपासू ही विशेषणे लावणे, हे स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन नव्हे तर या प्राण्यावर अन्याय आहे, असे कॉर्बेटनी नमूद केले आहे. वाघासारखी मांसभक्षक जनावरांचे काम मुळातच निसर्गाचा समतोल राखणे, हे आहे. विविध कारणांनी दुखावला गेल्यास किंवा अपघातानेच तो माणसांवर हल्ला करतो. त्यांचे नैसर्गिक भक्षक दुर्मीळ झाल्याने तो गुरांना मारतो. बिबटे हे एका अर्थाने वाघापेक्षा निराळे असून काही प्रमाणात ते जंगलातले सफाई कामगार म्हणून उपयुक्त आहेत, असेही कॉर्बेट सांगतात. वाघ हे अतिशय उमदे जनावर आहे. सद्य परिस्थितीत त्याच्या संरक्षणाच्या ठोस उपाययोजना आखल्या न गेल्यास पृथ्वी तलावावरील ही प्रजाती नष्ट व्हायला फारसा काळ लागणार नाही. तो नष्ट झाल्यास देशाला एक दुर्मीळ जैविक वारसा गमवावा लागेल. कॉर्बेट यांच्या या भविष्यवेधी वाणीची दखल घ्यावीच लागेल…!
सदानंद सतरकर








