भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून पट्टेरी वाघाला सन्मान प्राप्त झालेला असला आणि राष्ट्रीय व्याघ्र गणनेनुसार त्यांची संख्या वाढत असली तरी एका जागेवरून दुसऱया जागेवरती स्थलांतरण करणाऱया वाघांचे जगणे समस्याग्रस्त झालेले आहे.
मानवी समाजाने आपल्या भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच आर्थिक हेतूसाठी राष्ट्र, राज्यांची निर्मिती केलेली असली तरी त्या विषयीची जाणीव मुक्या जंगली श्वापदांना मुळी नसते. पट्टेरी वाघांची एकेकाळी आपल्या देशात समाधानकारक संख्या आणि स्थिती होती परंतु आपल्याकडच्या राजे, सरदार, ब्रिटिश अधिकारी, शिकारी यांच्या शिकार करण्याच्या शौकाने वाघांच्या एकंदर अस्तित्वावरती घाला घातला आणि त्यामुळे जेव्हा राष्ट्रीय स्तरावरती वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी नियोजनबद्ध प्रकल्प राबविला गेला तेव्हा या परिस्थितीत सुधारणा होत गेली परंतु आज मानवी समाजाला जेव्हा केंद्रीभूत मानून नवनवीन विकासाचे प्रकल्प राबविले गेले तेव्हा मानव आणि वाघ यांच्यातला संघर्ष वृद्धिंगत होत गेला. त्यामुळे बऱयाचदा अन्नपाणी तसेच आपल्या साथीदाराच्या शोधार्थ तर कधी मातेच्या छत्राअभावी भांबावलेल्या अवस्थेत वाघांना स्थलांतरास प्रवृत्त केलेले आहे. परंतु या विषयीचे संशोधन अभावाने होत असल्याने वाघांच्या स्थलांतरणाचे बरेच मुद्दे अनुत्तरीत राहिलेले आहेत.
वाघांची संख्या गणनेच्या अहवालानुसार वाढलेली असली तरी देशभरातला त्यांचा नैसर्गिक अधिवास मात्र दिवसेंदिवस असुरक्षित होत असून महाराष्ट्रातल्या चंद्रपूरच्या जंगलातल्या काही वाघांचे अन्यत्र स्थलांतर आणि पुनर्वसनाची बाब सध्या चर्चेत आहे. जंगली श्वापदांचे स्थलांतर फार पूर्वीपासून होत असले तरी सध्या त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून अन्यत्र जाण्यास भाग पाडणारी परिस्थिती मानवी समाजाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि अतिक्रमणापायी निर्माण झालेली आहे.
या विषयाकडे दुर्लक्ष होत चालले आहे. एखाद्या जंगलातला वाघ वारंवार तेथील माणसाशी संघर्ष देऊ लागला, गुरे, माणसे यांच्यावरती हल्ले करू लागला तर त्याविषयीचा सखोल अभ्यास केल्याशिवाय अशा वाघांना नरभक्षक ठरवून त्यांना जेरबंद करून ठेवतात तर काहीवेळा त्यांची प्रशिक्षित शिकाऱयांच्या मदतीने निघृणपणे हत्या केली जाते. कर्नाटक वन खात्याने भद्रा परिसरातल्या महिलेवरती हल्ला करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाघाला भीमगड अभयारण्यातल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता हेम्माडगाजवळच्या गवाळी-तळेवाडीत सोडला. एका वेगळय़ा जंगल प्रदेशात सोडलेल्या वाघावर देखरेख ठेवण्यास वन खात्याच्या अधिकाऱयाच्या गलथान कारभारापायी हा वाघ भीमगड परिसरातील माणसे आणि गुराढोरांसाठी कर्दनकाळ ठरला आणि शेवटी प्रशिक्षित शिकाऱयांना पाचारण करून कोंगळा येथे गोळी घालून त्या वाघाला ठार करण्याची नामुष्की कर्नाटक वन खात्यावर आली होती. या परिस्थितीला जबाबदार असणाऱया वन्यजीव संशोधक आणि वन कर्मचाऱयांचा बेभरवंशाचा कारभार राष्ट्रीय स्तरावरती चर्चेला आला होता.
एखाद्या जंगलातला वाघ परिसरातल्या गुराढोरांवर आणि माणसांवर हल्ला करणार नाही यासाठी पोषक स्थिती कशी निर्माण होईल या बाबतीत अगदी अल्प प्रमाणात वन खात्याचे अधिकारी स्थानिक लोकांना सहभागी करून योग्य उपाययोजना आखत असतात आणि त्यामुळे निर्माण झालेला वाघ-माणूस यांच्यातला संघर्ष सातत्याने शिगेला जात असलेला पहायला मिळतो. तेव्हा अशा वाघांना दुसऱया ठिकाणी स्थलांतरण व्हावे अथवा त्यांना जेरबंद करण्यासारख्या अवास्तव उपायांवरती भर दिला जातो. महाराष्ट्र वनखाते आणि डेहराडून येथील वन्यजीव संस्था यांनी संयुक्तरित्या केलेल्या अभ्यासानुसार टिपेश्वर अभयारण्य या यवनमाळ जिल्हय़ातून नर पट्टेरी वाघाने सुमारे 3,000 कि.मी. अंतराची पायपीट करून बुलढाणा जिल्हय़ातल्या ज्ञानगंगा अभयारण्यात बस्तान मांडल्याचे स्पष्ट झालेले आहे. टिपेश्वर अभयारण्यात जन्माला आलेल्या या वाघाला 27 फेब्रुवारी 2019 रोजी रेडिओ कॉलर यंत्रणा बसविल्यानंतर हा वाघ पूर्व विदर्भाच्या जंगल प्रदेशात वावरण्याबरोबर शेजारच्या तेलंगण राज्यातल्या आदिलाबादच्या जंगलातून पैनगंगा अभयारण्याकडे वळला अणि तेथून टिपेश्वर अभयारण्यातून औरंगबादच्या अंजठय़ाच्या जंगलात वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
प्रारंभी टिपेश्वर अभयारण्याच्या 360 कि.मी. परिघात, तेथून टिपेश्वर पासून ज्ञानगंगापर्यंत 1,475 आणि तेथून ज्ञानगंगा परिसरात 1,185 कि.मी.चा प्रवास त्या वाघाने केल्याचे स्पष्ट झालेले आहे. गेल्या दोन वर्षात सुमारे 3,000 कि.मी.चा प्रवास या वाघाने कोणत्या कारणासाठी आरंभलेला आहे हे जाणून घेण्याचे आव्हान वन्य किंवा अन्य कोणत्या कारणांसाठी वाघाने आपला अथकपणे आरंभलेला प्रवास हे जाणून घेण्यासाठी अभ्यास सुरू आहे.
महाराष्ट्रातील सहय़ाद्री व्याघ्र क्षेत्रात 2018 साली ज्याची छायाचित्रे कॅमेरा ट्रपने घेतली होती त्याचे अस्तित्व राज्यातल्या जिल्हय़ातल्या काळी व्याघ्रक्षेत्रात असल्याचे स्पष्ट झालेले आहे. दोन वर्षांत हा वाघ सहय़ाद्री व्याघ्र क्षेत्रातून काळी परिसरात 300 कि.मी.चा टप्पा गाठण्यात सफल ठरलेला आहे. 2020 मध्ये कॅमेरा ट्रपद्वारे काळी व्याघ्र क्षेत्रात 25 प्रौढ वाघ असल्याचे स्पष्ट झाल्याने हे जंगल वाघासाठी आकर्षण बिंदू ठरत असले तरी नियोजित रेल्वेमार्ग आणि अन्य विकास प्रकल्पांमुळे इथल्या नैसर्गिक व्याघ्रक्षेत्राचे अस्तित्व प्रतिकूल स्थितीला सामोरे जात आहे. 2 वर्षांपूर्वी काळी येथील वाघाने गोव्यातल्या सत्तरीच्या म्हादई अभयारण्यात संचार केल्याचे कॅमेरा ट्रपद्वारे उघड झाले आहे. खनिज उत्खनन, वाहतूक, निर्यातीसाठी ठिकठिकाणी चालू असलेल्या खाणी, वनक्षेत्रात होणारी वाढती जाळपोळ तसेच बागायती, शेती आणि लोकवस्तीच्या विस्तारासाठी होणारी जंगलतोड, तृणहारी प्राण्यांची वाढत जाणारी शिकार, जंगलातील नष्ट होणारे नैसर्गिक जलस्रोत आदी पार्श्वभूमीवरती वाघांचे स्थलांतर सध्या कळीचा मुद्दा झालेला आहे. आज गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकात जेथे जेथे लोक वाघाच्या मूर्तीचे पूजन करतात तेथे कधी काळी वाघांचे वास्तव्य होते. तेव्हासुद्धा माणसांचा संघर्ष व्हायचा. ब्रिटिश अमदानीत अशा नरभक्षक वाघांची निर्घृणपणे शिकार करणारा जीम कॉर्बेट कालांतराने वन्यजीवांचा संरक्षक झाला. देशभरात व्याघ्रक्षेत्रांना अधिसूचित करण्यात आले परंतु काही ठिकाणी स्थानिकांच्या सहकार्याअभावी व्याघ्रक्षेत्र निर्माण झाल्यावरती सौहार्दाचे संबंध वृद्धिंगत व्हावे यासाठी सरकार, समाज आणि वनखाते यांची तोंडे विरुद्ध दिशेला झाल्याने इथले ताणतणाव संपलेले नाही आणि त्यामुळेच वाघासारख्या राष्ट्रीय प्राण्याच्या अस्तित्वाची लढाई तीव्र होऊ लागली आहे.








