वाघासह बिबट्याच्या 11 नख्या हस्तगत, वनविभागाचा कराडमध्ये सापळा यशस्वी
प्रतिनिधी /कराड
वाघ आणि बिबट्याच्या नख्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा कराडच्या वनविभागाने सोमवारी रात्री पर्दाफाश केला. वाघ आणि बिबटय़ाची नखे विकताना एकाला रंगेहाथ पकडले तर त्याच्या साथीदाराला रविवार पेठेतील मयूर गोल्ड या दुकानातून उचलले. दोघांकडून वाघ आणि बिबट्याच्या 11 नख्या हस्तगत करण्यात आल्या असून या तस्करी प्रकरणात हे दोघेच नव्हे तर आंतरराज्य टोळीचा हात असल्याची शक्यता वनविभाने वर्तवली आहे. दिनेश बाबूलालजी रावल (वय 38, रा. सोमवार पेठ, कराड) व अनुप अरुण रेवणकर (वय 36, रा. रविवार पेठ, कराड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
वाघांची आणि बिबट्याची वाघनखे या दोघांनी नेमकी आणली कोठून? याचा तपास लावताना वनविभागाचा कस लागणार आहे. वनविभागाने या प्रकरणाच्या खोलात शिरून तपास केल्यास तस्करांची यादी आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. वनविभागाच्या कारवाईने कराड तालुक्यातील अनेकांची तंतरली असून वाघ नख्यासदृश्य लॉकेट गळ्यात मिरवणारांभोवती संशयाचे जाळे फिरू लागले आहे.
बनावट ग्राहक तयार करून संशयितांना पकडले
सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या पथकाला कराड शहरातील दोघांकडे वाघ आणि बिबटय़ाच्या नख्या असल्याची माहिती गोपनीय खबऱयाकडून मिळाली होती. वनविभागाने या माहितीच्या आधारे संशयितांच्या हालचालीवर नजर ठेवत त्यांच्याकडे नख्या असल्याची खात्री केली. खात्री पटल्यावर या दोघांना पकडण्यासाठी वनविभागाने सापळा रचला. साहायक वनसंरक्षक झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे निरीक्षक डोकी आदीमाल्ल्या, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह पथक या कानाचे त्या कानाला कळू न देता कामाला लागले. नख्या खरेदी करण्याचा बहाणा करीत या वन विभागाच्या पथकातील दोघांनी संशयितांशी थेट संपर्क साधला. कराडच्या कृष्णा नाक्यावरील सावित्री कॉर्नर इमारतीत एक दोनदा भेट घेऊन व्यवहारही ठरला.
वाघ नख्या विकायला आला अन अडकला
सोमवारी 16 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष नख्या घ्यायच्या आणि पैसे द्यायचे ठरले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी संशयित दिनेश रावल हा काही नख्या घेऊन विक्रीसाठी आला. वन विभागाच्या अधिकाऱयांनी बोलण्यात गुंतवत संशयितांकडून आणखी माहिती मिळवली. गोपनियता ठेवून रचलेल्या सापळ्यात तो अगदी सहज अडकला. त्याच्याकडून वाघनखे हस्तगत करण्यात आले. वनविभागाच्या सापळ्यात अडकल्यावर वाघांची नखे विकायला आलेल्याने बोलते होत पुढची माहिती वनविभागाला दिली. या माहितीच्या आधारे वनविभागाने रात्रीतच तपासाचे चक्र सुरू केले.
साथीदारही जाळ्यात…11 नखे जप्त
संशयित रावल याच्या चौकशीत त्याच्या साथीदाराची आणि इतर नख्यांची माहिती मिळाली. या माहितीत अनुप रेवणकर याचे नाव निष्पन्न झाले. वन विभागाच्या पथकाने शहरातील काझी वाडय़ाजवळ असलेल्या मयुर गोल्ड दुकानावर छापा टाकून रेवणकरलाही तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडून नऊ आणि दिनेश रावल याच्याकडून दोन अशा अकरा नख्या पथकाने हस्तगत केल्या.
हस्तगत करण्यात आलेल्या नख्या आरोपींनी कोठून आणल्या, याबाबतची ठोस माहिती अद्याप वन विभागाला मिळालेली नाही. वाघ तसेच बिबटय़ाची कोठे आणि कोणी शिकार केली, नख्या या दोन आरोपींपर्यंत कोणी पोहोचविल्या आणि पुढे त्या कोणाला विकल्या जाणार होत्या, याबाबतची माहिती आरोपींकडून घेतली जात असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी सांगितले.
वनरक्षक आकाश सारडा, वनपाल आनंदा सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, अरुण सोळंकी, संजय लोखंडे, प्रशांत मोहिते, अशोक मलप, साधना राठोड, मंगेश वंजारे, बाबुराव कदम, भारत खटावकर, सचिन खंडागळे, राजकुमार मोसलगी, राम शेळके यांनीही या कारवाईत सहभाग घेतला.
कराडात दोघा संशयितांकडून वाघ आणि बिबटय़ाच्या नख्या हस्तगत केल्यानंतर वनविभागाच्या तपासाला वेग आला आहे. हस्तगत अकरा नख्या वाघ आणि बिबटय़ाच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व नख्यांची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतरवर वाघाच्या नख्या किती आणि बिबट्याच्या किती, हे समोर येईल.
आंतरराज्य टोळीचा म्होरक्या कोण? वाघाच्या आणि बिबटय़ाच्या नख्या हस्तगत केल्यानंतर हे प्रकरण वनविभागाने गांभिर्याने घेतले आहे. या प्रकरणात आणखी कोणा कोणाचा हात आहे याचा तपास सुरू झाला आहे. आत्तापर्यंत किती वाघनख्या विकल्या यासह या आंतरराज्य टोळीचा नेमका म्होरक्या कोण आहे याचा तपास झाल्यावरच हे प्रकरण किती खोलवर आहे हे कळेल असे वनविभागाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.