उत्तर प्रदेशातील महू जिल्हय़ातली ही घटना आहे. गोहना कोतवाली क्षेत्रातील एका युवतीचे लग्न तिच्या घरच्यांनी एका तरुणाबरोबर ठरविले. तथापि, तिचे दुसऱयावरच प्रेम होते. लग्नाची वरात नेण्याची वेळ आली तेव्हा ती कोठेच दिसेना. त्यामुळे घरच्यांचा जीव खाली-वर होऊ लागला. तिच्या लग्नाच्या मुहूर्ताच्या आधी काही वेळ तिने न्यायालयात जाऊन आपल्या प्रियकराशी विवाह केल्याचे वृत्त नंतर समजले. यामुळे घरच्यांना तोंड दाखवावयास जागा उरली नाही.

नवरा मुलगा आणि त्याचे नातेवाईक तसेच आमंत्रित एव्हाना विवाहस्थळी येऊन ठेपले होते. त्यांच्यासमोर अब्रू जाण्याची वेळ आली. अखेरीस या युवतीच्या बहिणीलाच वधू म्हणून उभे करण्याचा निर्णय काही बुजूर्गांनी घेतला. त्यानंतर वरपित्याची अनुमती घेण्यात आली. वराने व त्याच्या पित्याने मोठय़ा मनाने ती दिली. त्यामुळे या युवतीच्या जागी तिच्या धाकटय़ा बहिणीचे लग्न त्याच मुहूर्तावर आणि त्याच ठिकाणी नवऱया मुलाबरोबर करून देण्यात आले.
ही घटना आता पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनली आहे. ऐनवेळी वधू बदलण्यास मान्यता दिल्याने वर आणि त्याचा पिता यांचे कौतुकही होत आहे. तसेच लग्नाआधी काही वेळ पळून जाऊन लग्न केलेल्या युवतीवर सामाजिक बहिष्कार घालण्याची चर्चा होत आहे. एकंदर हा प्रकार चर्चेचा विषय बनला आहे.









