वार्ताहर/शिराळा
अंत्री बु|| येथील तलावाच्या मुख्य विमोचकचे काम सर्व पूर्ण करून वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे पाणी या तलावात सोडणेकामी संबधित सांगली व वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेसोबत सकारात्मक चर्चा झाली असून वाकुर्डे योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लवकरच अंत्री बु|| तलावात येणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली.
याबाबत माजी मंत्री नाईक म्हणाले, सध्या कोरोना विषाणूच्या भीतीने व लॉकडाऊनमुळे पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागाची अनेक कामे मजुरांअभावी खोळंबली आहेत. सध्या उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवू लागल्याने बऱ्याच तलावातील पाणी पातळी घटली आहे. तालुक्यातील मोरणा मध्यम प्रकल्पातील घटलेली पाणी पातळी लक्षात घेता वारणा पाटबंधारे विभागामार्फत वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे खिरवडे आणि हात्तेगाव येथील विद्युत पंप सुरू करून वाकुर्डेचे योजनेचे पाणी करमजाई तलावात सोडण्यात आले आहे. तेथून पुढे हे पाणी मोरणा नदिद्वारे शिराळा येथील मोरणा मध्यम प्रकल्प तलावात सोडून वारणा पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
परंतु वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे पाणी अंत्री तलावात सोडले तर त्यातून पुढे ओढ्याला सोडायला अडचण निर्माण झाली आहे. कारण सध्या या ठिकाणी पाणी वितरित करावयासाठी असणाऱ्या मुख्य विमोचकच्या दुरुस्तीचे काम अर्धवट स्थितीत आहे. तसेच तलावाच्या बॅक वॉटर अनेक गावच्या पिण्याच्या पाणी योजना तसेच शेतकऱ्यांचे शेती पाणी उपसा विद्युत पंप अवलंबित आहेत. त्यामुळे सदरची अडचण दूर करणेसाठी वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विकास पाटील यांच्याशी चर्चा केली असता वाकुर्डे योजनेचे पाणी करमजाई धरणातून अंत्री बु|| तलावात सोडणेसाठी काहीही अडचण नसल्याचे सांगण्यात आले.
सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता करे यांचे बरोबर सविस्तर चर्चा झालेनंतर त्यांनी उपअभियंता फळाके, देसाई व संबधित बांधकामाचे ठेकेदार यांचेबरोबर चर्चा करून तलावातील मुख्य विमोचकचे बांधकाम आवश्यक त्या उंचीपर्यंत ताबडतोब करून घेऊन पिण्याच्या पाणी योजना व शेतकऱ्यांचे शेती पंप सुरू राहतील अशी व्यवस्था करून त्याबाबत त्यांनी खबरदारी व दक्षता घेऊ असे सांगितले.
तलावातील मुख्य विमोचक बांधकाम सध्या आवश्यक ठराविक उंचीपर्यंत झालेनंतर उर्वरित दुरुस्तीचे बांधकाम लॉकडाऊन संपल्यानंतर पूर्ण करून घेऊन या उन्हाळ्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेता येईल. जेणेकरून कोणालाही पाण्याची अडचण भासणार नाही. सध्याच्या आवश्यक बांधकामासाठी लागणारे साहित्य व अन्य बाबीकरिता तहसील विभागाकडून काही मान्यता लागणार आहेत. याबाबत शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याकामी प्रशासकीय पातळीवर लागणारी मदत सर्वोतोपरी करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच करमजाई धरण ते अंत्री बु|| तलाव या दरम्यान असणाऱ्या कॅनॉल मध्ये काही डागडुजी किंवा स्वच्छता करावयाची असेल तर स्थानिक शेतकऱ्यांनीही मदतीची तयारी दाखविली आहे. त्यामुळे लवकरच या तलावात वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे पाणी येऊन या परिसरातील लोकांची पिण्याची व शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याची अडचण दूर होणार आहे.
Previous Articleसामाजिक सर्वेक्षणासाठी सर्वांनी सहकार्य करावे
Next Article मसाला शेवगा








