प्रतिनिधी /शिराळा
शिराळा तालुक्याच्या उत्तर भागातील घरटी एकतरी माणूस कामानिमित्त मुंबईत स्थलांतरित झाला आहे. यांची गावाला नेहमी ये-जा होत असते. यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सचा वापर होतो. खाजगी ट्रॅव्हल्सवाले मनमानी पद्धतीने तिकिट आकारतात. म्हणून वाकुर्डे मुंबई मार्गावर पूर्वीप्रमाणे एसटी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शिराळा हा डोंगरी तालुका आहे. विकासाच्या संधी मर्यादित आहेत. गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून इथली लोकं मुंबईचे रहिवासी झाले आहेत. मुख्यत: माथाडी कामगार आहेत. गावाकडचं अर्थकारण मुंबईच्या पैशावर चालते. गावाला नेहमी ये-जा करण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सचा वापर होतो. पण यांचे दर सामान्य माणसाला न परवडणारे आहेत.
खाजगी ट्रॅव्हलचे दर दररोज बदलतात. अचानक गाडी रद्द होते. गाडीत बसल्यावर जास्त पैसे घेतले जातात. अनेक वेळा गाडी उशीराने सुटते. याचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून; पूर्वीची वाकुर्डे-मुंबई ही बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. ही एसटी ठाणे, सायन, मानखुर्दमार्गे बोरवली पर्यंत असावी. याबाबतचे लेखी निवेदन वाकुर्डे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आशा झिमूर यांनी आगार प्रमुखांना दिले आहे.
आगार व्यवस्थापक विद्या कदम यांना याबाबत विचारले असता, गाडी सुरू करण्यासाठी त्या सकारात्मक दिसून आल्या. जर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असेल तरच गाडी नियमितपणे चालू होईल. मात्र किमान भारमान भरणं आवश्यक आहे.








