वाकरेत सलग २४ वर्षापासून अभिनव उपक्रम – ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी / वाकरे
“होळीला पुरणपोळीचा नैवेद्य” अर्पण करण्याऐवजी “गोरगरीबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य” दाखवण्याचा अभिनव उपक्रम वाकरे (ता. करवीर) येथील कार्यकर्त्यांनी सलग २४ व्या वर्षी कायम ठेवला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पूर्वीपासून वाकरे येथील ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिरासमोर सामुदायिक आणि सार्वजनिक होळी पेटवण्याची प्रथा आहे. त्यासाठी संपूर्ण गावातून गोवऱ्या जमा करून होळी पेटवली जाते. त्यानंतर संपूर्ण गावातील घराघरातील पुरणपोळ्या, भात, नारळ असा नैवेद्य होळीमध्ये अर्पण करण्याची परंपरा गावात होती. मात्र होळीत टाकल्या जाणाऱ्या नैवेद्यामुळे हजारो पोळ्या, भात आणि नारळांची नासाडी होते.
म्हणून हा नैवेद्य गोरगरिबांना देण्यासाठी ग्रामस्थांचे परिवर्तन करण्याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रा.एस.पी.चौगले यांनी २३ वर्षांपूर्वी घेतला. गेली सलग २४ वर्षे यशस्वीपणे हा उपक्रम चालू आहे. यावर्षीही गावातील नैवेद्याच्या हजारो पोळ्या पुरणपोळ्या, भात, नारळ एकत्र करून रात्रीच गोरगरिबांना वाटण्यात आला.या वेळी सरपंच वसंत तोडकर, प्रा.एस.पी.चौगले, यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढील वर्षी रौप्यमहोत्सवी कार्यक्रम
या उपक्रमाची सुरुवात करणारे प्रा.चौगले यांनी पुढील वर्षी या उपक्रमाला २५ वर्ष पूर्ण होणार असल्याने रौप्यमहोत्सवी कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने करण्याचा मनोदय व्यक्त केला.