पुरातत्व विभागाने वाकरे येथील तलावाची केली पाहणी, उमाकांत रानिंगा, अमरजा निंबाळकर,उत्तम कांबळे यांनी दिली प्रत्यक्ष भेट
प्रतिनिधी / वाकरे
वाकरे ता. करवीर येथील ऐतिहासिक गाव तलाव उत्खननाच्या ठिकाणी मंगळवारी सकाळी ज्येष्ठ मूर्ती आणि पुराणशास्त्र अभ्यासक उमाकांत रानिंगा, कोल्हापूर हेरिटेजच्या अध्यक्ष अमरजा निंबाळकर, पुरातत्व विभागाचे उत्तम कांबळे आणि इतिहास अभ्यासक विकास नाईक यांनी प्रत्यक्ष भेट दिली. पुराणशास्त्र अभ्यासक उमाकांत रानिंगा यांनी सिंघनदेव यादव कालखंडातील हा तलाव असण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र याबाबत अधिक अभ्यास केल्यानंतर सांगता येणार असल्याचे ते म्हणाले.
श्री रानिगा यांनी दिलेली माहिती अशी की शिलाहार कालखंडानंतर भारतात सिंघनदेव यादव यांचा कालखंड सुरू झाला. सिंघनदेवची कारकीर्द ७० वर्षांची होती. शिलाहार कालखंडात सर्व मंदिरे, तलाव काळ्या दगडाने बांधलेले होते. मात्र सिंघनदेव कालखंडातील तलाव, मंदिरासाठी कोकणातील जांभा दगड वापरला जात होता. साधारण १२४० ते १३२० या कालखंडात या तलावाची निर्मिती झाली असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सर्वसाधारण गावासाठी पाणीपुरवठा करणारे तलाव उंच ठिकाणी बांधले जात होते आणि तेथून सायफन पद्धतीने पाणी येत होते. मात्र हा तलाव गावाच्या दक्षिण दिशेला उतारावर असून त्यामुळे त्याचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जात नसावा असे त्यांनी सांगितले.
तसेच तलावाच्या परिसरात वसाहत असली पाहिजे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यापुढील काळात जसजसे उत्खनन होईल तसतशा इतर बाबी पुढे येतील असे ते म्हणाले. एकूणच हा तलाव ऐतिहासिक असला तरी याचा अन्यत्र कोल्हापूरच्या इतिहासामध्ये उल्लेख सापडतो का हे पाहणे जरुरीचे असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान यापुढील काळात या तलावाचे उत्खनन कसे करावे, याबाबतची पद्धत कशी असावी याची माहिती हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर देणार आहेत. तलावाच्या ऐतिहासिक संदर्भाची माहिती मुर्ती अभ्यासक उमाकांत रानिगा हे देणार आहेत. तर उत्खननाची नियमावली व नोंद करणे याची माहिती पुरातत्व विभागाचे उत्तम कांबळे हे करणार आहेत. यावेळी सरपंच वसंत तोडकर,प्रा. एस.ए. पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. पुरातत्व विभागाने या गाव तलावाला भेट दिल्याने यापुढील काळात या तलावाचे ऐतिहासिक महत्त्व समोर येणार आहे.