प्रतिनिधी / सातारा
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी जनजागृती हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सार्वजनिक उत्सव व सण साजरे करताना गर्दी होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. मिरवणुका व दुर्गा दौड यांना प्रतिबंध असून जुन्या रूढी परंपरा जपताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी आवश्यक काळजी घ्यावी. गावचे पाटील हे पोलीस प्रशासनाचे कान आणि डोळे असतात. त्यांनी उत्सव काळात गावात बाहेरून येणा-या व्यक्तींवर पाळत ठेवावी आणि गावात शांतता राहील यासाठी सतर्क रहावे, अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे- खराडे यांनी केल्या.
पंचायत समितीच्या किसन वीर सभागृहात वाई पोलीस ठाण्याच्यावतीने सार्वजनिक दुर्गादेवी व नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी व पोलीस पाटील यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.यावेळी दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांढरे, सचिव विनोद काळे, अक्षय टिके, शशिकांत फरांदे, मीनल तरडे, सुवर्णा महागंडे तसेच सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी उत्सव काळातील जिल्हा प्रशासनाची नियमावली व मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. देवीची प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणूक काढणे, वाद्य वाजवणे, डॉल्बीचा वापर यास मनाई आहे. जमावबंदी आदेश असल्याने दांडिया, गरबा नृत्य, भजन, कीर्तन यास प्रतिबंध आहे. आरती करताना सामाजिक अंतर पाळावे. सॅनिटायझर व मास्कचा वापर करावा. सार्वजनिक मंडळांनी पालिका व ग्रामपंचायतीची परवानगी घ्यावी. कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदुषण व शासनाच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
यावेळी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस उपअधीक्षक डॉ.जानवे यांचा सत्कार करण्यात आला. हवालदार प्रशांत शिंदे व बापूराव मदने यांनी बैठकीचे नियोजन केले. संदीप प्रभाळे यांनी आभार मानले.
Previous Article… तर ड्रग्ज कनेक्शनचा तपास मुंबई पोलीस करणार : गृहमंत्री
Next Article सांगली : विहिरीत ट्रॅक्टर कोसळून शेतकरी ठार









