चोरटय़ांच्या मारहाणीत महिला जखमी, वाई शहरात खळबळ
प्रतिनिधी/ सातारा
रविवार पेठेत सर्वानंदनगर येथे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घराचे दार उघडून अज्ञात तीन जणांनी महिलेस चाकूचा धाक दाखवत उजव्या हातावर वार करुन जखमी केले. तिच्या गळ्यातील दागिन्यांसह कपाटातील दागिने आणि रोख रक्कम असा सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लांबवल्याची घटना घडली. या घटनेने वाई शहरात खळबळ उडाली असून वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण, श्वान पथक व ठसे तज्ञांनाही बोलवण्यात आले. श्वान पथक त्याच परिसरात घुटमळले.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गौरी वंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या पती आणि दोन मुलांसह वाई येथे राहतात. त्या घरकाम करतात तर पती हॉटेलमध्ये सिक्युरिटीगार्ड आहेत. त्यांचे पती दररोज रात्री 10.30 वाजता कामावर जातात व सकाळी 7.30 वाजता येतात. त्यांचा मोठा मुलगा शाळेला सुट्टी असल्याने फलटण येथे आजोळी गेला आहे. दि. 8 रोजी गौरी वंजारी यांनी रात्री 9.15 वाजता पती व लहान मुलगा श्रीराज यांच्यासोबत जेवण केले अन् पती डय़ुटीला गेले. थोडा वेळ टीव्ही पाहिल्यानंतर दोघे झोपी गेले. आतून कडी लावण्यास विसरले होते. रात्री दोन वाजता अचानक त्यांना जाग आली तेव्हा त्यांच्या डोक्याजवळ एक तोंडाला रुमाल बांधलेला काळा सावळा व्यक्ती अंगात राखाडी रंगाचा टीशर्ट, निळय़ा रंगाची जिन्स अंदाजे 25 वर्षाचा त्यांन दिसला. त्याने सोन्याचे गंठण, कानातले दागिने काढ असे म्हणत त्यांना दम भरला. त्याला पाहून गौरी या ओरडल्या. त्यावेळी त्याने त्याच्या हातातील सुऱयाने डाव्या हातावर वार केला. कोपराजवळ जखमी झाली. त्याने ओरडली तर अजून मारीन असा दम दिला. त्याच्या भितीपोटी गळय़ातील व कानातील दागिने काढून दिले. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती त्यांना दिसला. तो काही अंतरावर उभा होता. तिसरा व्यक्ती घराच्या दारात उभा होता. हातावर वार करणाऱया व्यक्तीने कपाटाची चावी मागितली. नाही असे म्हणताच त्याच्या हातातील चाकूसारख्या हत्याराने कपाट उघडले. लॉकरमधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेवून पळून गेले. त्यामध्ये 30 हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी घंटन, 10 हजार रुपयांचे सोन्याचे टॉप्स, 80 हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस, 16 हजार रुपयांची पाच ग्रम व तीन ग्रमची अंगठी,20 हजार रुपयांचे कर्णफुले, 7 हजार रुपयांच्या लहान मुलांच्या कानातील बाळया, सोन्याचा बदाम, चांदीचे पैजण, कमरपट्टा, चांदीची चैन, 12 हजार रुपये रोख व 3 हजार रुपयांचा मोबाईल असा 2 लाख 13 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
ते जाताच गौरी यांनी बाहेर येवून आरडाओरडा केल्याने शेजारचे जागे झाले. याची माहिती वाई पोलिसांना मिळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गौरी यांच्या औषध उपचार करुन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सकाळी पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक आणि श्वान पथक दाखल झाले. श्वान पथकाने त्याच परिसरात घुटमळत राहिले. काही अंतरावर गौरी यांची पर्स आढळून आली. अधिक तपास पोलिस करत आहेत.









