वाई / प्रतिनिधी :
वाई येथील पेठकर कॉलनीत चोरट्यांनी पाच घरे फोडण्याचा प्रयत्न केला. एका घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 40 हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना सोमवारी (दि.9) मध्यरात्री घडली. चोरी करणारे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, वाई पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वाई शहरातील पेठकर कॉलनीत सोमवारी (दि.9) रात्री चोरट्यांची टोळी शिरली. ज्यांची घरे बंद दिसत होती, त्यांचे कडी कोयंडे ही टोळी उचकट होती. चोरट्यांनी लक्ष्मण हरिबा राजपुरे यांच्या घराचे दार उघडून आतमध्ये प्रवेश केला. या घरातील कपाटात ठेवलेले 40 हजाराचे दागिने त्यामध्ये 15 हजाराची अंगठी, 12 हजाराची कर्णफुले, 3 हजाराची सोन्याची नथ, 3 हजाराचा बदाम, 1 हजाराचा चांदीचा छला असा ऐवज चोरून नेला.
त्यानंतर चोरट्यांनी पेठकर कॉलनीतल्या सुनील मोहन पवार, संपत तुकाराम कदम, आनंदा मारुती खडसे, निर्मला दशरथ जगताप, मोहन गेंणबा खडसरे यांच्या घराकडे मोर्चा वळवला होता. परंतु, नागरिकांनी आरडाओरडा करताच चोरटे पळून गेले. हे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, पोलीस त्याचा तपास करत आहेत.









