एनआयएकडून मोस्ट वाँटेड गँगस्टर्सची यादी ः गोल्डी बराडचे नाव प्रथमस्थानी
@वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय तपास यंत्रणांसाठी मोस्ट वाँटेड ठरलेले गँगस्टर विदेशात लपून गुन्हे घडवून आणत आहेत. हे गँगस्टर स्वतःच्या हस्तकांद्वारे भारतात हत्या, खंडणी वसुलीपासून शस्त्रास्त्र तस्करीचे काम करवून घेत आहेत. एनआयएने आता अशा 28 गँगस्टरांची यादी तयार केली आहे. या यादीनुसार सर्वाधिक 9 गँगस्टर कॅनडा तर 5 गँगस्टरांनी अमेरिकेत आश्रय घेतला आहे.
एनआयएच्या यादीत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गँगस्टर गोल्डी बराड आहे. यादीत सामील गँगस्टर हे प्रामुख्याने पंजाब अन् राजस्थानमधील आहेत, ते लॉरेन्स टोळी अन् बबीहा टोळीशी संबधित आहेत. एनआयएनुसार या गँगस्टर्सनी गुन्हे केल्यावर बनावट पासपोर्टच्या मदतीने विदेशात पलायन केले आहे.
अमेरिकेत लपलाय गोल्डी बराड
एनआयएनुसार गोल्डी बराड हा अमेरिकेत लपून आहे. गोल्डी बराडचे बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सूत्रधार लखबीर सिंहशी कनेक्शन आहे. लखवीर सिंहने मोहाली आणि तरनतारनमध्ये रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (आरपीजी) हल्ला करविल्याचा आरोप आहे.
यादीत लॉरेन्सचा भाऊ अन् भाचा
या यादीत कुख्यात गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल आणि भाचा सचिन थापन देखील आहे. अनमोल हा अमेरिकेत तर सचिन थापन अझरबैजानमध्ये लपून आहे. अमेरिकेत लपून बसलेला अनमोल हा भारतात स्वतःच्या हस्तकांद्वारे खंडणी वसूल करत असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपट कलाकार आणि गायक, उद्योजकांना त्याच्याकडून लक्ष्य केले जाते. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी त्याचे संबंध असल्याचा आरोप आहे. एनआयएच्या यादीत बंबीहा टोळी चालविणारा लक्की पटियाल देखील सामील असून तो सध्या आर्मेनियात आहे. कुख्यात शार्पशूटर दविंदर बंबीहाच्या एन्काउंटरनंतर लक्की पटियाल आणि सुखप्रीत बुड्ढा ही टोळी चालवत आहेत. सुखप्रीत बुड्ढा सध्या तुरुंगात कैद आहे.
दहशतवादी रिंदा पाकिस्तानात
या यादीत पाकिस्तानात आश्रय घेतलेला दहशतवादी हरविंदर रिंदाचे नाव आहे. काही काळापूर्वी रिंदाचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे, रिंदाचा मृत्यू आजार, अमली पदार्थांचे अतिसेवन आणि टोळीयुद्धामुळे झाल्याचे बोलले जात होते, परंतु अधिकृतपणे कुणीच त्याच्या मृत्यूची पुष्टी दिलेली नाही.








