प्रतिनिधी / सातारा :
ऑनलाईन शाळा सुरू ठेवण्यासाठी नेट पॅक गरजेचा आहे. परंतु पैशाअभावी सर्वांना महिन्यांचा नेट पॅक रिचार्ज करणे शक्य नाही. यामुळे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने नेट पॅक योजना सुरू केली आहे. अशी योजना सातारा पालिकेनेही सुरू करण्याची मागणी होत असली तरी बजेटमध्ये तशी तरतुद नसून वसुली अभावी ही योजना राबवता येणार नसल्याचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सांगितले.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरात शाळा बंद होत्या. त्यामुळे ऑनलाईन शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या वर्षी ऑनलाईन वर्गात 50 टक्केपेक्षा कमी उपस्थिती आहे. गरीब, गरजु विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही, नेटपॅकसाठी पैसे नाही. ही कारणे समोर येत आहेत. यामुळे मुंबई महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी एक हजार रूपये देण्याचा निर्णय झाला आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे पालकांच्या खिशावरील नेट पॅक चा भार कमी झाला आहे. ही योजना सातारा नगरपालिकेनेही सुरू करणे गरजेचे आहे.
सातारा शहरात नगरपालिकेच्या एकूण 18 शाळा आहेत. त्यामध्ये 1 हजार 500 विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे पालक मोलमजुरी करतात. कोरोनाचा शिरकाव झाल्याने यांच्या रोजगार परिणाम झाला आहे. दोन वेळचे पुरेसे अन्न मिळत नाही. तर मोबाईल आणि नेट पॅक साठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न पालकांसमोर उभा आहे. परंतु नगरपालिकेने बजेटमध्ये अशी योजना राबविण्याची कोणतीही तरतुद केलेली नाही. नगरपालिकेतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश मोफत दिला जातो. कोरोना महामारीमुळे वसुली नाही. वसुली अभावी परिस्थिती बिकट बनली असल्याचे उपनगराध्यक्ष शेंडे यांनी सांगितले.









