श्रीमद भागवत पुरणाचे बारा स्कंध असून त्यातील एकादश स्कंधावर नाथांनी भाष्य लिहिले आहे. तेच एकनाथी भागवत होय. याला उद्धव गीता असेही म्हणतात. याला गीता म्हणायचे कारण म्हणजे यात भगवंतांनी उद्धवाला उपदेश केलेला आहे. मूळ भागवत संस्कृत भाषेत असून त्यावर मराठीमध्ये एकनाथ महाराजांनी भाष्य लिहिले आहे. नाथांनी भक्तीचे, नामस्मरणाचे श्रे÷त्व अनेक अंगांनी मांडले आहे. पुराणात भागवत श्रे÷, त्यातील उद्धव गीता परमश्रे÷ ! म्हणून नाथांनी तीच निरुपणाला घेतली आहे. यात भगवंतानी मोक्षाचा मार्ग सांगितला आहे. या ग्रंथाचे महात्म्य असे की, मूळ भागवत संस्कृतमध्ये आहे. त्यावर कोणीतरी मराठीत लिहित आहेत हे कळल्यावर काशीचे पंडित अत्यंत रागावले. त्यांनी नाथांना त्यांचे मराठीतील भाष्य घेऊन काशीला बोलावले. पण प्रत्यक्ष ग्रंथरचना पाहून ते अत्यंत प्रभावित झाले. अजून नाथांनी ग्रंथाचा शेवटचा पण महत्त्वाचा भाग लिहिलेला नव्हता. म्हणून तेथील पंडितांनी नाथाना अगत्याने ठेवून घेतले व ग्रंथ पूर्ण करण्याची विनंती केली. त्यानुसार नाथांनी ग्रंथ पूर्ण केला तो पाहून काशीतील मंडळी अत्यंत आनंदित झाली व त्या आनंदाच्या भरात त्यांनी नाथांची ग्रंथासह हत्तीवरून मिरवणूक काढली. एकनाथी भागवत या ग्रंथाचे एकूण बत्तीस अध्याय आहेत अशा या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या अभ्यासाने आपले जीवन अधिक समृद्ध होईल असा विश्वास वाटतो.
प्रथम अध्याय सार
श्रीमद भागवत पुरणाच्या एकादश स्कंधावर नाथांनी जे भाष्य लिहिले तेच एकनाथी भागवत होय. यात नाथांनी भक्तीचे अनेक अंगांनी मांडले आहे. नामस्मरणाचे महत्त्व नाथांनी वर्णन केले आहे. प्रथम अध्यायात नाथांनी देव, संत, सद्गुरु यांची स्तुती करून ग्रंथरचनेस त्यांनी सहाय्य करावे अशी विनंती केली आहे. पुराणात भागवत श्रे÷, त्यातील उद्धव गीता परमश्रे÷ आहे म्हणून नाथांनी तीच निरुपणाला घेतली आहे. यात भगवंत मोक्षाचा मार्ग सांगणार आहेत. मुख्य ग्रंथाची सुरुवात दुसऱया अध्यायापासून होणार आहे. दुसऱया अध्यायात नारद व वसुदेव यांच्यातील संवाद रंगणार आहे.
द्वितीय अध्याय भाग 1
वसुदेवांची नारदमुनींना विनंती
श्रीकृष्ण पिता वसुदेव द्वारकेत रहात होते. श्रीनारदमुनी कृष्णाच्या प्रेमामुळे वारंवार द्वारकेत येत असत. असेच एकदा ते आले असता वसुदेव म्हणाले, ‘आपल्यामुळे भक्ती भगवत स्वरूप झाली आहे. आता मला भागवत धर्माची ओळख करून द्या. श्रीकृष्ण हाच परमात्मा आहे हे मी ओळखलंय पण त्याच्याकडून हे ब्रह्मज्ञान मला मिळणार नाही. कारण तो माझा मुलगा असल्याने मी त्याला गुरुसमान आहे म्हणून तो मला ब्रह्मज्ञान देणार नाही. तेव्हा हा मायरूपी समुद्र तरून जाण्यासाठी तुम्ही तारू व्हा. हा समुद्र केवळ पायाने चालून तरून पैलतीर गाठता येईल असा भागवत धर्माचा महिमा मला सांगा.’
(क्रमशः)








