वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानच्या वसुंधरा राजे सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपचे माजी वरिष्ठ नेते घनश्याम तिवारी यांची शनिवारी ‘घरवापसी’ झाली आहे. जयपूरमधील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी तिवारी यांना भाजपचे सदस्यत्व प्रदान केले आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसवासी झालेले तिवारी हे वसुंधरा राजे यांचे कट्टर विरोधक राहिले आहेत.
राजे यांच्या विरोधामुळेच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत भारतवाहिनी हा नवा पक्ष स्थापन केला होता. याच पक्षाद्वारे त्यांनी 2018 मध्ये सांगानेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, परंतु त्यांना अनामत रक्कमही वाचविता आली नव्हती.
काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व मी कधीच स्वीकारलेले नव्हते. प्रारंभापासूनच मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडला गेलेलो आहे. तर वसुंधरा यांच्यासोबतचे भांडण काळासोबत संपुष्टात आले आहे. भविष्यात कुठलीच निवडणूक लढण्याची इच्छा नाही, आता केवळ पक्षासाठी काम करू इच्छितो असे उद्गार तिवारी यांनी भाजपप्रवेशानंतर काढले आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च 2019 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जयपूरमध्ये एक रोड शो सभेत तिवारी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिवारी हे राज्यातील भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये सामील राहिले आहेत. पक्षात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. राजस्थान विधानसभेचे सदस्यपद त्यांनी 6 वेळा भूषविले आहे.
भैरोसिंग शेखावत सरकारमध्ये त्यांनी ऊर्जामंत्री म्हणून काम पाहिले आहे. तर राजे सरकारमध्ये त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.









