:प्रतिनिधी / झाराप:
नेरुरपार (नेरुर) येथील ‘वसुंधरा’ संस्थेचे संस्थापक चंद्रकांत बाबाजी उर्फ सी. बी. नाईक (83) यांचे शनिवारी पहाटे बोरिवली-मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ‘सीबी काका’ म्हणून सर्वत्र परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
19 जानेवारी 1937 रोजी मुंबईतील गिरण संस्कृतीतील जुन्या ‘बावन चाळी’त त्यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले बी. ए. एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1962 मध्ये बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी नोकरीची कारकीर्द सुरू केली. 1978 मध्ये बाबा आमटे यांच्या ‘आनंदवना’शी त्यांचा संपर्क आला. तेथे त्यांच्यातील कार्यकर्त्याला उर्जेचे बळ मिळाले. बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’ अभियानात कन्याकुमारी ते काश्मीर व अरुणाचल ते ओखा असा प्रवास त्यांनी केला.
1994 मध्ये बँकेमध्ये उपव्यवस्थापक पदावर असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली. कुडाळ तालुक्यातील नेरुरपार-नेरुर हा त्यांचा मूळ गाव. आपल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातून विधायक कार्य सुरू करण्यासाठी 1995 मध्ये त्यांनी ‘वसुंधरा’ ट्रस्टची स्थापना केली. नेरुरपार येथील स्वत:च्या घरातून हे कार्य त्यांनी सुरू केले. वैज्ञानिक राजीव वर्तक (मुंबई) यांच्या साथीने ‘फिरत्या ज्ञान-विज्ञान प्रयोगशाळे’चा सृजन प्रयोग सुरू केला. कुडाळ हायस्कूलचे तत्कालिन प्राचार्य प्रदीप बर्डे यांच्या समन्वयातून शैक्षणिक चळवळीची बीजे त्यांनी रोवली.
बिबवणे (ता. कुडाळ) येथील दोन खोल्यांच्या भाडय़ाच्या जागेत ‘वसुंधरा’ संस्थेचे कार्य बाळसे धरू लागले. नरडवे (ता. कणकवली) हायस्कूलचे सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक केदारी पटाडे तसेच जिल्हय़ातील तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय प्रज्ञाशोध व संवर्धन’ उपक्रमाला नाईक यांनी संस्थाश्रय मिळवून दिला. शब्दयात्रा फिरते वाचनालय, दहावी गुणवत्ता वाढ प्रकल्प, प्रज्ञाशोध तसेच वैज्ञानिक कृती शिबिरे, पाणलोट व्यवस्थापन आदी उपक्रमांना त्यांनी प्रेरणात्मक बळ दिले.
‘वसुंधरा’चे कार्य स्वत:च्या जागेत असावे, असा त्यांचा ध्यास होता. त्यातूनच नेरुर ग्रा. पं. ने दिलेल्या नेरुरपार येथील साडेचार एकर जागेत विज्ञान केंद्राचा पसारा वाढला. आरोग्य विषयक उपक्रमही त्यांनी सुरू केले. नेरुरपार येथे चित्रपट महोत्सव भरविण्याचे धाडसही त्यांनी केले. शिक्षिका असणाऱया त्यांच्या पत्नी सौ. लता नाईक यांचे त्यांच्या कार्यात मोठे योगदान होते. वसुंधराच्या माध्यमातून अनेक माणसे जोडली गेली. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सारस्वत बँकेचे माजी अध्यक्ष कै. एकनाथ ठाकुर, डॉ. अनिल नेरुरकर (अमेरिका), रमेश कचोलिया (मुंबई), आर्किटेक्चर अविनाश हावळ (पुणे), गजानन कांदळगावकर (कुडाळ), योगेश प्रभू, शेखर ढवळे (मुंबई), दयानंद पुजारे, उन्मेष सावंत (मुंबई), वंदना करंबेळकर (सावंतवाडी), सीबींचे व्याही दिनेश पांगम (सावंतवाडी), विद्याधर वेतुरेकर, सतीश नाईक तसेच जिल्हय़ातील मुख्याध्यापक, शिक्षक आदींनी नाईक यांना समर्थपणे साथ दिली. भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच वसुंधरा संस्थेला अनेक पुरस्कार नाईक यांच्या नेतृत्वाखाली मिळाले.









