आवक मंदावली, दरात वाढ, सर्वसामान्यांना फटका
बेळगाव
मागील काही दिवसांपासून सातत्याने वळीव पाऊस हजेरी लावत असल्याने याचा भाजीपाला पिकावर परिणाम झाला आहे. बाजारात आवक कमी होत असल्याने मागील आठवडय़ाच्या तुलनेत भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. वाढता उष्मा आणि पाऊस यामुळे भाजीपाल्यांचे पीक अडचणीत सापडले आहे.
शनिवारी आठवडी बाजारात काकडी 50 रुपये किलो, ढबू 60 रु. किलो, गवार 80 रु. किलो, टोमॅटो 15 रु. किलो, बटाटा 20 रु. किलो, भेंडी 40 रु. किलो, वांगी 40 रु. किलो, कारली 60 रु. किलो, कोबी 10 रु. एक, दोडकी 60 रु. किलो, फ्लॉवर 20 रु. एक, कोथिबींर 15 रुपयाला एक पेंडी, पालक 10 रुपयाला दोन पेंडी, लालभाजी 10 रुपयाला एक पेंडी, 20 रुपयाला तीन पेंडी, मेथी 10 रुपयाला एक पेंडी, नवलकोल 10 रुपयाला चार, शेवग्याच्या शेंगा 10 रुपयाला एक पेंडी अशी विक्री सुरु आहे.
यंदा सातत्याने पाऊस होत असल्याने भाजीपाला पिकावर परिणाम झाला आहे. ऑक्टोबरदरम्यान लागवड केलेला भाजीपालाही अतिपावसामुळे खराब झाला आहे. तसेच सध्या लागवड होत असलेला भाजीपालाही बदलत्या हवामानामुळे व पावसामुळे खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पुन्हा भाजीपाल्यांच्या दरात वाढ होण्याची चिंता व्यक्त होत आहे.
लाल मिरचीच्या मागणीत वाढ
वर्षभराचे तिखट एकाच वेळी करून ठेवण्यासाठी लाल मिरचीच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे मिरची दुकानात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मात्र यंदा लाल मिरचीचा भावदेखील वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक दराचा फटका सहन करावा लागत आहे. विशेषतः बॅडगी, संकेश्वरी, गुंठूर आणि जवारी मिरचीला मागणी अधिक आहे.









