वार्ताहर / उचगाव
सार्वजनिक बांधकाम विभागाचे करायचे काय खाली डोके वर पाय, भ्रष्टाचारी अधिकारी आणि विभागाचे करायचे काय ? … रस्त्याचा निधी जातो कुठे ? अशा घोषणांनी गुरुवारी दुपारी वळीवडे रोडवरील निरंकारी कॉलनी परिसर दणाणून गेला. गांधीनगर दलित महासंघाने वळीवडे कॉर्नर ते इंदिरानगर झोपडपट्टी पर्यंतच्या रस्त्याची झालेली प्रचंड दुरवस्था याविरोधात गुरुवारी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांना धारेवर धरले. आंदोलनाचे नेतृत्व गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी केले.
यावेळी अध्यक्ष राजू कांबळे याने प्रतिकात्मक म्हणून स्वतःची दुचाकी एका मोठ्या खड्यात आडवी करून या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून ते मातीच्या पाण्याने भरून गेल्याने वाहन चालवताना लक्षात येत नसल्याने दररोज अपघात होत. असून सार्वजनिक बांधकाम विभाग नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप केला.
वळीवडे कॉर्नर ते वळीवडे हा रस्ता सहा महिन्यांपासून मरणयातना सोसत आहे, अनेक जण अपघातग्रस्त झाले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत जेथे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तेथे ते चिखल भरून बुजविण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या. आंदोलकांसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले गेले. आंदोलकांनी त्यांना रस्त्याकडे सहा महिने दुर्लक्ष का केले, याचा जाब विचारला.
त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. रस्ता केव्हा दुरुस्त करणार, याचे प्रथम उत्तर द्या अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यावर इंगवले म्हणाले की, दसरा-दिवाळीनंतर रस्ता दुरुस्त करू. या उत्तराने आंदोलक आणखी संतप्त झाले. ताबडतोब रस्ता दुरुस्त झाला पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावर पुढील महिन्यात रस्ता दुरुस्त करण्यात येईल, असे आश्वासन इंगवले यांनी दिले.
यावेळी दलित महासंघाचे गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे, विभाग प्रमुख निखिल पोवार, वीरेंद्र भोपळे, उपाध्यक्ष अनिल हेगडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश देवकुळे, सचिन कोरे, गणेश पाटोळे, मोहन बोराडे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
Previous Articleसोलापूर ग्रामीणमध्ये 384 नवे पॉझिटिव्ह तर 11 जणांचा मृत्यू
Next Article क्रांतिवीर राजगुरूंचे आयुष्य वेबसिरीजमध्ये









