वार्ताहर / उचगांव
करवीर तालुक्यातील वळिवडे येथील एक हॉटेल व्यावसायिक तरुण आणि गांधीनगर येथील एका महिलेचा कोरोना अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आणि गावामध्ये एकच खळबळ माजली. गांधीनगर परिसरामध्ये कोरोनाने आज अखेर शिरकाव केला नव्हता परंतु काल रात्री आलेल्या या अहवालांनी परिसरातील गांभिर्य वाढवले. वळिवडे आणि गांधीनगरातील काही भाग सील केला असून. वळिवडे गाव तीन दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
वळिवडेतील या तरुणाचे हॉटेल असून शिवभोजन थाळी केंद्रही तो चालवितो. गेल्या आठवड्याभरात त्याला त्रास होऊ लागल्याने सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात त्याने उपचार घेतल्याचे समजते. तरीही प्रकृती चांगली झाली नसल्याने त्याला कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला होता. रात्री उशिरा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. गांधीनगरातील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलेचा अहवालही रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला.ही महिला कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय येथे रविवार पासून उपचार घेत होती. अहवाल आल्यानंतर रात्री उशिरा ही झोपडपट्टी सील करण्यात आली. आज सकाळी वळिवडे येथे सरपंच अनिल पंढरे, पोलीस पाटील दिपक पासाण्णा, ग्रामसेवक बी. डी. पाटील, तलाठी प्रविण शेजवळ, ग्रामपंचायत सदस्य भगवान पळसे, प्रकाश शिंदे, संजय चौगुले, कर्मचारी सुनिल देवणे, बाजीराव पोवार, वैभव पाटील या सर्वांनी मिळून गावातील प्रमुख रस्ते बंद केले.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने संपूर्ण गाव तीन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे गावातून लाऊडस्पिकरवरुन घोषित करण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह तरुण रहात असलेला परिसर सील करण्यात आला असून त्याच्या कुटुंबातील आणि संपर्कात आलेल्या १० जणांना तपासणीसाठी पाठविण्यात आले असून या तरुणाच्या संपर्कात आणखीन कोणी आले होते का याचा शोध घेण्यात येत आहे. गांधीनगर सरपंच रितू लालवानी आणि कर्मचारी यांनी कोरोना पॉझिटिव असणारी महिला रहात असलेला इंदिरानगर झोपडपट्टी परिसर रात्रीमध्ये सील केला.
Previous Articleमुलगा झाला या खुशीत वाटले पेढे, पण तो निघाला कोरोनाग्रस्त..
Next Article इचलकरंजीत माजी नगरसेवकासह सहा जण कोरोना पॉझिटिव्ह








