2020 मध्ये 15 टक्क्यांचा लाभ : एचडीएफसी मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
वर्षाच्या अंतिम दिवशी प्रमुख समभागांच्या निर्देशांकामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास स्थिरावत बंद झाले आहेत. नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पावित्रा घेतलेला आहे. कारण चालू वर्षात कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे आर्थिक क्षेत्र मोठय़ा प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसून आले आहे. परंतु डिसेंबर अखेर लसीच्या चाचण्या यशस्वी ठरत असल्याचा लाभ नव वर्षात गुंतवणूकदारांना होणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.
चढउताराच्या प्रवासात प्रमुख कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर सेन्सेक्स 5.11 अंकांनी वधारुन निर्देशांकाने 47,751.33 अंकांचा विक्रम नोंदवला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 0.20 अंकांनी घसरुन निर्देशांक 13,981.75 वर बंद झाला आहे. वाढीसोबत दिवसभरात सेन्सेक्स 47,753.11 वर खुला झाला, दरम्यान सेन्सेक्सने 47,896.97 चा उच्चांक प्राप्त केला आहे. दुसरीकडे निफ्टीने पहिल्यांदाच 14,000 चा टप्पा पार केला आहे. चालू वर्षात निर्देशांक 15 टक्क्यांच्या वाढीसोबत बंद झाला आहे. यामध्ये सेन्सेक्समध्ये 15.7 टक्क्यांची तर निफ्टीत 14.9 टक्क्यांची तेजी आली आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये सेन्सेक्समध्ये एचडीएफसी सर्वाधिक 1.65 टक्क्यांनी नफ्यात राहिली आहे. सोबत सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, एशियन पेन्ट्स, टायटन, आणि इन्फोसिस तेजीमध्ये राहिले आहेत. दुसऱया बाजूला टीसीएसला सर्वाधिक 1.33 टक्क्यांचे नुकसान झाले आहे. याच्यासह घसरणीमध्ये अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, कोटक बँक आणि टेक महिंद्रा यांचा समावेश राहिला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजारांमध्ये आशियातील टोकीयो आणि दक्षिण कोरियाचा बाजार नवीन वर्षानिमित्ताने बंद राहिले आहेत. इतर बाजारांचा विचार करता ऑस्ट्रेलियाचा एस ऍण्ड पी 1.4 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले आहे. तसेच हाँगकाँगचा हँगसेंग 0.3 टक्क्यांनी मजबूत राहिला आहे.








