प्रतिनिधी/ पणजी
राज्यात नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी काल शुक्रवारी अनेक ठिकाणी अपघात होऊन अनेकजण जखमी झाले. एका दुचाकीस्वारासह दोन कारचालकांना जीव गमवावा लागला. धारबांदोडा येथील अपघातात पर्यटक कारचालकाने झाडाला ठोकर दिल्यामुळे कारचालक ठार झाला तर दोघेजण जखमी झाले. पणजी दिवजा सर्कल येथील अपघातात दुचाकीचालक ठार झाला. पणजी-ओल्ड गोवा सहापदरी महामार्गावर रायबंदर-चिंबल जंक्शन उतरणीवरील अपघातात कारचालक ठार झाला.

येथील दिवजा सर्कल येथे काल पहाटे ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव केदार राऊत असे आहे. रात्रपाळीची डय़ूटी करून चिंबल येथे आपल्या घरी जात असताना दुचाकीस्वाराने समोरून येणाऱया ट्रकवर चुकीच्या दिशेने जाऊन धडक दिली. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मयत केदार हा मूळ ओडिशा येथील
मयत केदार हा मूळ ओडिशा येथील असून तो गेल्या काही वर्षांपासून चिंबल येथे राहत होता. पणजी येथील एका खासगी कंपनीत तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. गुरूवारी रात्रपाळी करून पहाटे घरी जात असताना त्याला अपघात झाला. मयत केदार हा एमएच 07 एल 2612 या क्रमांकाच्या दुचाकीवरून चिंबल येथे जात होता. त्याचवेळी जीए 07 एफ 9058 या क्रमांकाचा कचऱयाचा ट्रक पणजी मार्केटच्या दिशेने येत हेता. दिवजा सर्कलवर या दोन्ही वाहनांचा अपघात झाला. पणजी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून ते पुढील तपास करीत आहे.
रायबंदर-चिंबल जंक्शन अपघातात कारचालक ठार
पणजी-ओल्ड गोवा सहापदरी महामार्गावर रायबंदर-चिंबल जंक्शन उतरणीवरील अपघातात कारचालक ठार झाला. हा अपघात पहाटे 5.30 च्या दरम्यान झाला. ट्रोली ट्रक ओल्ड गोव्याहून पणजीच्या दिशेने येत होता तर कारचालक पणजीहून ओल्ड गोव्याच्या दिशेने जात होता. या अपघातात सिकेरी येथील कारचालक आग्नेलो आल्मेदा जागीच ठार झाला.









