अंतिम लढतीत भारतावर 209 धावांनी दणदणीत विजय, भारताचा डाव 234 धावांत समाप्त
वृत्तसंस्था/ लंडन
येथे झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 209 धावांनी दणदणीत विजय मिळवित पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. भारताने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पहिल्या डावात आक्रमक शतकी खेळी केलेल्या ट्रॅव्हिस हेडला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. डब्ल्यूटीसी चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी व टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ बनला आहे.

भारताला पुन्हा एकदा आयसीसीची प्रमुख स्पर्धा जिंकण्यात अपयश आले. भारताला विजयासाठी शेवटच्या दिवशी 280 धावांची गरज होती. 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी भारताने 3 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली होती. या धावसंख्येवरून शेवटच्या दिवसाच्या खेळास सुरुवात केली. पण स्कॉट बोलँडच्या दर्जेदार व भेदक माऱ्यासमोर कोहली व रवींद्र जडेजा एकाच षटकात बाद झाल्यानंतर भारताच्या आशेला धक्का बसला. स्लिपमध्ये स्मिथने उजवीकडे झेपावत अप्रतिम झेल टिपत कोहलीला माघारी धाडले. कोहलीने 49 तर जडेजा शून्यावर बाद झाला. रहाणे व श्रीकर भरत यांनी थोडाफार प्रतिकार करीत 33 धावांची भर घातली. पण रहाणेला स्टार्कने यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केल्यानंतर भारताचा पराभवही निश्चित झाला. रहाणेने 108 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 46 धावा जमविल्या. ऑफस्पिनर लियॉनने भरत, शार्दुल ठाकुर यांना बाद केले आणि शमीला बोलँडकरवी झेलबाद करीत भारताचा डाव 63.3 षटकांत 234 धावांत संपुष्टात आणत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. अर्धा तास वाढीव सत्रात भारताचा डाव उपाहाराआधीच समाप्त झाला. लियॉनने 41 धावांत 4, बोलँडने 46 धावांत 3 बळी मिळविले. याशिवाय स्टार्कने 2, कमिन्सने एक बळी टिपला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सर्वच विभागात भारतापेक्षा खूप सरस कामगिरी केली. भारताला मात्र 2013 नंतर आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात पुन्हा एकदा अपयश आले. दोन वर्षांपूर्वी पहिल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्येही भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची निवड न करणे हा पहिल्या दिवशी चर्चेचा विषय ठरला होता तर हाय प्रोफाईल फलंदाजी लाईनअपचे अपयश हेच भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव 121.3 षटकांत सर्व बाद 469.
भारत प.डाव 69.4 षटकांत सर्व बाद 296.
ऑस्ट्रेलिया दु.डाव 84.3 षटकांत 8 बाद 270 डाव घोषित.
भारत दु.डाव 63.3 षटकांत सर्व बाद 234 : रोहित शर्मा 43 (60 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), गिल 18 (19 चेंडूत 2 चौकार9, पुजारा 27 (47 चेंडूत 5 चौकार), कोहली 49 (78 चेंडूत 7 चौकार), रहाणे 46 (108 चेंडूत 7 चौकार), जडेजा 0, केएस भरत 23 (41 चेंडूत 2 चौकार), शार्दुल ठाकुर 0, उमेश यादव 1, शमी नाबाद 13 (8 चेंडूत 3 चौकार), सिराज 1, अवांतर 13. गोलंदाजी : लियॉन 4-41, बोलँड 3-46, स्टार्क 2-77, कमिन्स 1-55.









