भारतीय युवा सेना विक्रमी पाचव्या जेतेपदासाठी महत्त्वाकांक्षी, इंग्लंडचा संघ 24 वर्षांनंतर फायनलमध्ये नशीब आजमावणार
नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) / वृत्तसंस्था
आयसीसी यू-19 विश्वचषक स्पर्धेतील 34 वर्षांच्या इतिहासात 7 वेळा फायनलमध्ये पोहोचत 4 वेळा अजिंक्यपद संपादन करत सर्वाधिक यशस्वी ठरलेला भारतीय संघ आज इंग्लिश यू-19 संघाविरुद्ध आपल्या आठव्या फायनलमध्ये उभा ठाकेल, त्यावेळी जेतेपदावर पाचव्यांदा शिक्कामोर्तब करणे, हेच त्यांचे मुख्य लक्ष्य असणार आहे. अर्थात, इंग्लंडचा संघही धडाकेबाज फॉर्ममध्ये असल्याने आजची लढत विशेष उत्कंठावर्धक ठरण्याची अपेक्षा आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 6.30 वाजता या निर्णायक फायनलला सुरुवात होईल.

येथील सर व्हीवियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगणाऱया आजच्या फायनलमध्ये यश धुल आणि कंपनी आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी पुरेपूर प्रयत्नशील असेल. कर्णधार यश धुल व उपकर्णधार शेख रशीद हे दिग्गज खेळाडू कोरोनाची बाधा झाल्याने साखळी फेरीतील 3 पैकी 2 सामन्यात खेळू शकले नसले तरीही भारताने सहजपणे बाद फेरी गाठली आणि त्यानंतर धुल-रशीद संघात परतल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांना आणखी तडाखे देत फायनलमध्ये सहजपणे धडक मारली. त्या पार्श्वभूमीवर, भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
धुल-रशीद उत्तम बहरात
कोरोनाची बाधा झालेल्या खेळाडूंमध्ये सर्वात तीव्र लक्षणे आढळून आलेल्या धुलने कोरोनावर मात केल्यानंतर खेळलेल्या तिन्ही डावात विस्फोटक फलंदाजी साकारत आपल्या गुणवत्तेची पुरेपूर प्रचिती दिली. यात उपांत्य फेरीतील त्याच्या धडाकेबाज शतकाचा प्राधान्याने समावेश होतो.
शेख रशीदने देखील फलंदाजीवरील आपली हुकूमत अधोरेखित करत चौफेर फटकेबाजी साकारली. उपांत्य फेरीतील त्याची 94 धावांची खेळी विशेष लक्षवेधी ठरली. सलामीवीर अंगकृश रघुवंशी व हरनूर सिंग बरेच बचावात्मक खेळले. मात्र, येथे त्यांना आपला पवित्रा बदलणे भाग असेल. भारतीय युवा खेळाडूंची अनपेक्षित प्रगल्भता अवघ्या क्रिकेट जगतासाठी आश्चर्याचा धक्का देणारी ठरत आली असून ऑस्ट्रेलियाला याची प्रचिती आली आहे. आता इंग्लंडसमोर देखील असेच सातत्य कायम राखण्याचा भारतीय युवा सेनेचा निर्धार असणार आहे.
भारतीय गोलंदाजीची भिस्त राजवर्धन हंगरगेकर, रवी कुमार या आघाडीच्या जलद गोलंदाजांवर तर विकी ओस्तवालसारख्या अव्वल फिरकीपटूवर असेल, हे निश्चित आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगकृश रघुवंशी, शेख रशीद, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, मानव पारख, कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, गर्व संगवान, दिनेश बाणा, आराध्या यादव, राज बावा, वासू वत्स, रवी कुमार.
इंग्लंड ः टॉम प्रेस्ट (कर्णधार), जॉर्ज बेल, जोशुआ बॉयडेन, ऍलेक्स हॉर्टन, रेहान अहमद, जेम्स सॅलेस, जॉर्ज थॉमस, थॉमस ऍस्पिनवॉल, नॅथन बॅर्नवेल, जेकब बेथेल, जेम्स कोल्स, विल्यम लक्सटॉन, जेम्स ऱयू, फतेह सिंग, बेंजामिन क्लिफ.
सामन्याची वेळ ः सायं. 6.30 वा.
रोड टू फायनल
भारत
लढत / निकाल
साखळी सामना / द. आफ्रिकेविरुद्ध 45 धावांनी विजयी
साखळी सामना / आयर्लंडविरुद्ध 174 धावांनी विजयी
साखळी सामना / युगांडाविरुद्ध 326 धावांनी विजयी
उपांत्यपूर्व लढत / बांगलादेशविरुद्ध 5 गडय़ांनी विजयी
उपांत्य लढत / ऑस्ट्रेलियाविरुद्ध 96 धावांनी विजयी
इंग्लंड
लढत / निकाल
साखळी सामना / बांगलादेशविरुद्ध 7 गडय़ांनी विजयी
साखळी सामना / कॅनडाविरुद्ध 106 धावांनी विजयी
साखळी सामना / युएईविरुद्ध 189 धावांनी विजयी
उपांत्यपूर्व लढत / द. आफ्रिकेविरुद्ध 6 गडय़ांनी विजयी
उपांत्य लढत / अफगाणिस्तानविरुद्ध 15 धावांनी विजयी
आयसीसी यू-19 विश्वचषक स्पर्धेतील जेते-उपजेते
वर्ष / यजमान / विजेते / उपविजेते
1987-88 / ऑस्ट्रेलिया / ऑस्ट्रेलिया / पाकिस्तान /
1997-98 / द. आफ्रिका / इंग्लंड / न्यूझीलंड
1999-00 / श्रीलंका / भारत / श्रीलंका
2001-02 / न्यूझीलंड / ऑस्ट्रेलिया / द. आफ्रिका
2003-04 / बांगलादेश / पाकिस्तान / विंडीज
2005-06 / श्रीलंका / पाकिस्तान / भारत /
2007-08 / मलेशिया / भारत / द. आफ्रिका /
2009-10 / न्यूझीलंड / ऑस्ट्रेलिया / पाकिस्तान
2012 / ऑस्ट्रेलिया / भारत / ऑस्ट्रेलिया
2013-14 / युएई / द. आफ्रिका / पाकिस्तान
2015-16 / बांगलादेश / विंडीज / भारत
2017-18 / न्यूझीलंड / भारत / ऑस्ट्रेलिया
2019-20 / द. आफ्रिका / बांगलादेश / भारत
आयपीएल लिलावाच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक कामगिरी सर्वाधिक महत्त्वाची!
पुढील आठवडाअखेरीस आयपीएलचे मेगा ऑक्शन रंगणार असून या पार्श्वभूमीवर आजच्या फायनलमध्ये धमाकेदार खेळी साकारणाऱया एखाद-दुसऱया खेळाडूची कारकीर्द सदर लिलावात उजळू शकते. त्या पार्श्वभूमीवर, फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर भारतीय युवा संघाच्या कामगिरीवर आयपीएल प्रँचायझींचे लक्ष असेल तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल.
यू-19 संघाला दडपण हाताळण्याबाबत विराटचे मार्गदर्शन

आज (शनिवार दि. 5) इंग्लंडविरुद्ध रंगणाऱया निर्णायक फायनलच्या पूर्वसंध्येला भारतीय युवा संघाला विराट कोहलीने मार्गदर्शन केले. 2008 मध्ये यू-19 वर्ल्डकप जिंकून देणाऱया विराटने नंतर जागतिक स्तरावरील सर्वोत्तम फलंदाजापर्यंतचा प्रवास सहज साध्य केला. या पार्श्वभूमीवर, त्याचा अनुभव युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरावा, या उद्देशाने सदर पेप टॉक आयोजित केले गेले.
दोन्ही फायनलिस्ट संघ यंदाच्या हंगामात अद्याप अपराजित
भारत व इंग्लंडचे दोन्ही युवा संघ यंदाच्या यू-19 विश्वचषकात फायनलमध्ये पोहोचेतोवर अपराजित राहिले आहेत. इंग्लंडचा संघ 1998 नंतर प्रथमच फायनलमध्ये पोहोचला तर भारतीय संघ यापूर्वी मागील आवृत्तीत उपविजेता ठरला. त्यापूर्वी भारतीय संघाने विक्रमी 4 वेळा जेतेपद संपादन केले. यातील कोणता संघ आपली अपराजित घोडदौड कायम राखण्यात यशस्वी होणार, हे आजच्या निर्णायक लढतीत स्पष्ट होईल.
भारताला टॉम प्रेस्ट-जोशुआ-रेहान अहमदपासून दक्ष रहावे लागेल का?
आजच्या लढतीत इंग्लंडचा संघ 1998 पासून चालत आलेला जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील असेल आणि या मोहिमेत कर्णधार टॉम प्रेस्ट, जलद गोलंदाज जोशुआ बॉयडेर व मनगटी फिरकीपटू रेहान अहमद यांच्यावर त्यांची मुख्य भिस्त असणार आहे. टॉम प्रेस्टने यंदाच्या विश्वचषकात 73 च्या सरासरीने 292 धावांचे योगदान दिले तर रेहान अहमदने मधल्या षटकात ब्रेकथ्रू मिळवून देण्यात सातत्य राखले. डावखुरा जलद गोलंदाज जोशुआने 9.53 च्या लक्षवेधी सरासरीने 13 बळी घेतले आहेत. या त्रिकुटाचा भारतीय फलंदाज कसा सामना करणार, यावर बरीच समीकरणे अवलंबून असतील.









