विद्यार्थी संख्येची मर्यादा अन् वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे व्यवसाय अडचणीत
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना… लॉकडाऊन… अनलॉक आणि यानंतर सुरू झालेले ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षण… या शिक्षणाच्या माध्यमातून सध्या शैक्षणिक वारी सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र शैक्षणिक वाटचालीचा प्रवास सुखकर करणाऱया वर्दीच्या रिक्षाची चाके मात्र अजूनही थांबलेलीच आहेत. विद्यार्थी संख्येची मर्यादा, वाढत्या इंधनाच्या किमती, पालकांची मानसिकता अशा अडचणीत वर्दी रिक्षा अडकली आहे. परिणामी दहा महिन्यांपासून वर्दी रिक्षा बंदच आहेत. यामुळे वर्दी रिक्षा मामांकडून कोरोनाचे संकट धूसर होत असताना इ. 6 वी 10 वी बरोबरच प्राथमिक शाळा देखील सुरळीत व्हाव्यात, असा सूर व्यक्त होत आहे.
शाळेपासून घर आणि घरापासून शाळा हा प्रवास प्रामुख्याने वर्दीच्या रिक्षामुळे अधिकच सोयीस्कर बनतो. मात्र सध्या सर्व इयत्तांचे वर्ग पूर्णक्षमतेने सुरू नसल्याने वर्दी रिक्षा अजूनही लॉकच आहे. एक-दोन विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करणे परवडणारे नाही. शिवाय अनेक विद्यार्थी ऑनलाईन वर्गाचा आधार घेत आहेत. यामुळे किमान 6 विद्यार्थी देखील मिळणे कठीण आहे. प्रामुख्याने इ. 1 ली ते 5 वीचे विद्यार्थी रिक्षाच्या वर्दीवर अवलंबून असतात. मात्र सदर इयत्ता सुरू नसल्याने 90 टक्के वर्दीच्या रिक्षा बंदच आहेत. यामुळे परस्परांवर अवलंबून असणारा शैक्षणिक प्रवासाचा भाग असलेल्या वर्दीवाल्या रिक्षा मामांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत शाळा लवकर सुरू व्हाव्यात, अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
वर्दी करणे पालकांना खर्चिक -संजय पाटील

ऑफलाईन बरोबरच ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था असल्याने सर्वच विद्यार्थी शाळेला येत नाहीत. शिवाय तीन-चार विद्यार्थ्यांसाठी वर्दी करणे पालकांना खर्चिक तर आम्हाला परवडणारे नाही. यामुळे अजूनही वर्दी बंदच आहे. मागील 21 वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले.
प्राथमिक वर्ग सुरू झाल्याखेरीज वर्दी नाहीच -अनिल हुवाण्णाचे

15 वर्षांपासून वर्दी करत आहे. मात्र अशी परिस्थिती प्रथमच आली आहे. सध्या 6 वी ते 10 वीच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी वर्दीच्या रिक्षाची चाके थांबलेलीच आहेत. शिवाय मोठय़ा इयत्तांचे विद्यार्थी बस व सायकलने प्रवास करतात. यामुळे प्राथमिक वर्ग सुरू झाल्याखेरीज वर्दी नाही.
इंधनाच्या किमती वाढल्याने अनेक अडचण -संपत सरनोबत

पालकांमध्ये अजूनही भीती असल्याने पालक रिक्षातून शाळेत पाठविणे टाळत आहेत. सध्या केवळ दोनच विद्यार्थी वर्दी रिक्षात आहेत. इ. 1 ली ते 5 वीच्या शाळा सुरू झाल्याखेरीज वर्दी रिक्षा धावणे कठीण आहे. सध्या इंधनाच्या किमती वाढत असताना व्यवसायासमोर अनेक अडचणी आहेत.
मागील दहा महिन्यांपासून वर्दी बंदच -रमेश होनगेकर

वर्दीची रिक्षा हा व्यवसायाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. मात्र मागील दहा महिन्यांपासून वर्दी बंदच आहे. 16 ते 17 वर्षांपासून या व्यवसायात असून प्रथमच अशी समस्या निर्माण झाली आहे. शाळा सुरळीत चालू झाल्याखेरीज वर्दी व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू होणार नाही.
एक-दोन मुलांसाठी रिक्षा फिरवणे शक्य नाही -संतोष पाटील

एकदिवसाआड विद्यागम योजना सुरू आहे. यामुळे वर्दीतून विद्यार्थ्यांची ने-आण करणे परवडणारे नाही. एक-दोन मुलांसाठी रिक्षा फिरवणे शक्य नाही. किमान 8 ते 10 विद्यार्थी असणे गरजेचे आहे. मागील 15 वर्षांपासून हा व्यवसाय करत असून प्रथमच हा व्यवसाय इतक्या महिन्यांपासून ठप्प असल्याचे मत व्यक्त केले.









