नवी दिल्ली
सिडनी कसोटीत भारतीय खेळाडूंवर प्रेक्षकांतील एका गटाने वर्णद्वेषी शेरेबाजी करण्याचा प्रकार चौथ्या दिवशी रविवारीही घडल्याने मोहम्मद सिराजने त्याबद्दल पंचांकडे तक्रार केली. त्याची दखल घेत या प्रेक्षकांची मैदानातून हकालपट्टी करण्यात आली. या पेक्षकांनी सिराजकडे पाहून ब्राऊन डॉग व बिग मंकी, अशी वर्णद्वेषी टिपणी केल्याचा आरोप बीसीसीआयने केला आहे. शनिवारीदेखील सिराज व बुमराहवर या प्रेक्षकांनी टिपणी केली होती. रविवारी ऑस्ट्रेलियन डावाच्या 86 व्या षटकावेळी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणारा सिराज स्क्वेअरलेग पंचांकडे गेला. त्यावेळी मैदानातील दुसरे पंच व भारताचे वरिष्ठ खेळाडू तेथे एकत्र आले आणि चर्चा सुरू झाली. यामुळे सुमारे 10 मिनिटे खेळ थांबला होता. तक्रारीनंतर मैदानातील सुरक्षा रक्षक आणि न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी शेरेबाजी करणाऱया त्या प्रेक्षकांना गाठले आणि त्या सहा जणांची तेथून हकालपट्टी केली. सामन्यावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी भारतीय खेळाडूंनी शनिवारी खेळ संपल्यानंतर पंचांना त्याबद्दल सांगण्याचे ठरविले होते. मात्र असा काही प्रकार घडल्यास त्याची माहिती पंचांना त्वरित देण्याची सूचना खेळाडूंना केली असल्याने ही बाब त्यांच्या निदर्शनास आणण्यात आली, असेही या सूत्राने सांगितले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून त्यांनी भारतीय संघाची माफीही मागितली आहे.









