सबबिट यंत्रणा मोडकळीस : 2 गटांतील वादांकडे पोलिसांचे दुर्लक्ष, अनेक खुनांचा तपासही रखडलेलाच

दुहेरी खूनप्रकरणी याच सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रतिनिधी /बेळगाव
दसरोत्सवाच्या उत्साहात असणाऱया बेळगावकरांना सणाच्या दुसऱया दिवशीच दुहेरी खुनाच्या बातमीने झटका बसला. महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सुळेभावी हे महालक्ष्मी देवीमुळे प्रसिद्ध आहे. अलीकडे वाढत्या गुन्हेगारी कारवायांनी ठळक चर्चेत आले आहे. गुन्हेगारीचे प्रकार थोपविता यावेत यासाठी पाच वर्षांपूर्वी बेळगावपासून सबबिटची व्यवस्था अस्तित्वात आली. ज्या बेळगावात या व्यवस्थेला सुरुवात झाली. त्याच शहरात अधिकाऱयांच्या अनास्थेमुळे ती कमालीची शिथिल पडली.
दसऱयाच्या दुसऱया दिवशी 6 ऑक्टोबर 2022 च्या रात्री 9 वाजता सुळेभावी येथील रणधीर ऊर्फ महेश रामचंद्र मुरारी (वय 26), प्रकाश निंगाप्पा हुंकरी-पाटील (वय 24) या दोन तरुणांचा भीषण खून करण्यात आला. सुरुवातीला हा खून कोणी व कशासाठी केला, याचा उलगडा झाला नव्हता. मारिहाळ पोलिसांनी दोन दिवसांत सहा मारेकऱयांना अटक करून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी मारिहाळ पोलीस स्थानकातील हवालदार बी. एन. बळगण्णावर व आर. एस. तळेवाड या दोघा जणांना निलंबित केले आहे. बी. एन. बळगण्णावर हे पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एस. बी. कॉन्स्टेबल म्हणून काम पाहात होते. तर आर. एस. तळेवाड यांच्यावर सुळेभावी बिटची जबाबदारी होती. आपल्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडणाऱया घडामोडींची माहिती मिळविण्यासाठीच एस. बी. डय़ुटी असते.
खरेतर दसऱयादिवशी 5 ऑक्टोबर रोजी सुळेभावी येथील यल्लेश हुंकरी-पाटील (वय 22) या तरुणाला मारहाण झाली. खून झालेला रणधीर ऊर्फ महेश मुरारी याने त्याला मारहाण केली होती. खरेतर खून झालेले तरुण व अटक करण्यात आलेले आरोपी हे एकेकाळी सारेच एकत्र होते. आपल्या गटाचा डॉन कोण होणार, यावरून वर्चस्व वाद निर्माण झाला. एकमेकांना धमकावण्याचे प्रकार सुरू झाले. जीवे मारण्याच्या धमक्मया देऊ लागले. या वर्चस्व वादातूनच दुहेरी खुनाचा प्रकार घडला आहे.
सुळेभावी येथील काही तरुण सोशल मीडियावर रिल्स बनवून अपलोड करत होते. हातात तलवार व चाकू घेऊन उघड उघड धमकावण्याची भाषा त्यात होती. बिट पोलीस आणि एस. बी. विभाग सांभाळणाऱया हवालदारांना याची पुसटशी माहिती मिळाली असती तरी कदाचित दुहेरी खुनाचा प्रकार टाळता आला असता. 5 ऑक्टोबर रोजी वादावादी, हाणामारीचा प्रकार घडला. याचीही खबर पोलिसांना नव्हती. मात्र, साऱया गावात त्याची चर्चा होती. मारहाण करणारे किंवा मार खाल्लेले पोलिसांपर्यंत गेले नाहीत.
पाच वर्षांपूर्वी बेळगावात सुरू झालेली पोलीस सबबिट व्यवस्था संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आली. सध्या बेंगळूर येथे कार्यरत असलेले व तत्कालिन जिल्हा पोलीसप्रमुख बी. आर. रविकांतेगौडा यांनी या संपूर्ण व्यवस्थेची आखणी केली होती. एखादी गल्ली किंवा गावाचे बिट सांभाळणाऱया पोलिसावर गावची जबाबदारी सोपविली तर तो काय करू शकतो? हे त्यांनी सरकारला दाखवून दिले होते.
गावातील घडामोडींवर लक्ष ठेवून स्थानिक माहिती जमविली, वेळोवेळी संबंधितांना सूचना केल्या तर अनेक प्रकार टाळता येतात, असा यामागचा हेतू होता. त्यामुळे साहजिकच पोलिसांच्या कामाचे स्वरुप बदलले. सुरुवातीला प्रत्येक बिटची वही लिहिण्याची पद्धत सुरू झाली. बिट पोलिसाने आपल्या जबाबदारी असलेल्या गावात माहितीचे जाळे तयार करायचे असते. आता तर वॉट्सऍप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपमध्ये आज गावात काय घडले, याची माहिती पोलिसांना वेळोवेळी दिली जात असते. सुळेभावी येथील घटनेची पुसटशी माहितीही मारिहाळ पोलिसांना नव्हती.
सबबिट व्यवस्था कमकुवत बनत चालली आहे का?
ज्या बेळगावपासून सबबिट व्यवस्थेला सुरुवात झाली. त्याच बेळगावात ही व्यवस्था कमकुवत बनत चालली आहे का? असा संशय निर्माण झाला आहे. म्हणून पोलीस आयुक्तांनी मारिहाळ पोलीस स्थानकातील हवालदार व पोलीस अशा दोघा जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. केवळ दोन पोलिसांवर कारवाई करून या व्यवस्थेत सुधारणा होणार आहे काय? बिट व्यवस्थेत ही शिथिलता का आली? वरि÷ पोलीस अधिकाऱयांचे या व्यवस्थेवर नियंत्रण नाही का? आदी प्रश्नांची उत्तरे वरि÷ांना शोधावी लागणार आहेत.
मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात खुनांची मालिकाच सुरू आहे. अनेक खुनांचा अद्याप तपासही लागलेला नाही. दि. 5 जुलै रोजी मुतगा येथील शशिकांत अष्टेकर यांच्या शेतवाडीतील विहिरीत शिरविरहित धड आढळून आले होते. खून करून सुमारे 25 ते 35 वयाच्या अनोळखीचा मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचे आढळून आले होते. या प्रकरणाचा अद्याप छडा लागला नाही. तपास तर दूरच खून झालेला व्यक्ती कोण, याचा उलगडाही झालेला नाही.
26 नोव्हेंबर 2020 रोजी कबलापूर, ता. बेळगावजवळ निशिकांत सुभाषराव दहीकांबळे (वय 31) मूळचा रा. उदगीर, जि. लातूर या खासगी कंपनीतील कर्मचाऱयाचा खून करून मृतदेह टाकून देण्यात आला होता. या घटनेला दोन वर्षे व्हायला आली तरी अद्याप या खुनाचाही उलगडा झाला नाही. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच बेळगाव शहर व तालुक्मयात खुनांची मालिका सुरू आहे. पोलीस यंत्रणेला याचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. कारण गुन्हेगारी रोखण्यापेक्षा स्वउद्धाराकडेच त्यांचे अधिक लक्ष आहे.
परिसरात गँगवॉरची मालिका
31 मार्च रोजी करडीगुद्दीजवळ मुदकाप्पा चंद्राप्पा अंगडी (वय 25) रा. सुनकुप्पी, ता. बैलहोंगल या तरुणाचा खून करण्यात आला होता. अत्यंत क्षुल्लक कारणावरून ही घटना घडली होती. तुंबळ हाणामारीत सात जण जखमी झाले होते. बोलेरोतून बेळगावहून आपल्या गावी जाताना कॅम्पबेल कारखान्याजवळ परिचयाची व्यक्ती भेटली म्हणून बोलेरो उभी करून मुदकाप्पा बोलत उभा होता. रस्त्यावर क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर मुदकाप्पाचा खून करण्यात आला होता. गँगवॉर सदृश ही घटना घडली होती. सध्या चर्चेत असलेला सुळेभावी येथील दुहेरी खुनाचा प्रकारही गँगवॉरसारखाच झाला आहे.









