प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक होत आहे. त्यातही बेंगळूरमध्ये परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे अनेक आयटी (माहिती तंत्रज्ञान) कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविला आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची मुदत 31 मार्च रोजी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता कोरोना संसर्ग वाढीमुळे बेंगळुरात येण्याऐवजी घरातूनच काम करण्याची सूचना असणारे ई-मेल आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱयांना पाठविण्यात येत आहेत.
बेंगळूरमधील प्रतिष्ठीत आयटी कंपन्यांनी आपल्या काही कर्मचाऱयांना यापूर्वी 31 मार्चपर्यंत वर्क फ्रॉम होमची सूचना दिली होती. पण शहरातील कोरोना संसर्ग वाढीमुळे वर्क फ्रॉम होमचा कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. इन्व्हेस्टमेंट बँक आणि फायनान्स सर्व्हिसच्या कर्मचाऱयांना बुधवारपासून (1 एप्रिल) कामावर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अनेक कंपन्यांनी जून आणि सप्टेंबरपर्यंत वर्क फ्रॉम होमचा कालावधी वाढविल्याची माहिती नास्कॉमचे उपाध्यक्ष के. एस. विश्वनाथन यांनी दिली आहे.









