वृत्तसंस्था / पुणे
कोरोनाच्या वाढत्या संकटाचा सामना करताना, विविध क्षेत्रातील रोजगारावर परिणाम होत असल्याचे दिसून आहे. यात आता वर्क फ्रॉम होम ही संकल्पना मोठय़ा प्रमाणात वापरण्यासाठी पुढे येत आहे. यात सर्वात महत्त्वाचे क्षेत्र म्हणून आयटीकडे पाहिले जाते. आगामी काही दिवसांमध्ये या क्षेत्राचा चेहरा बदलणार असल्याचे मत तज्ञांकडून मांडण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग आपल्याला होऊ नये याकरीत गर्दी कमी करुन सामाजिक अंतर राखण्यासाठी प्रशासनासोबत माध्यमाकडून नेहमी नागरिकांना आवाहन केले जात आहे. देशातील टेक्नालॉजी क्षेत्राशी संबंधीत असणारे 30 लाख कामगारांमधील निम्मे आपल्या आपल्या घरातून काम करत आहेत. नेक्स्टवेल्थ आंत्रपेन्योर्सचे संस्थापक श्रीधर मिट्टा यांनी सांगितले की जर का सध्याची वर्क फ्रॉर्म होम ही कामाची पद्धती अजून काही दिवस कायम ठेवली तर आयटी क्षेत्रातील 20-30 टक्के लोक घरातून काम करण्यास तयार होण्याची शक्यता आहे. सध्या नेक्स्टवेल्थचे दोन हजाराहून अधिक लोक घरातून काम करत आहेत.
देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कंन्सल्टसी यांनी जवळपास 40 टक्के कामगारांना घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. कंपनीचे सीईओ राजेश गोपीनाथ यांनी आपल्या कर्मचाऱयांना पाठविलेल्या मेलमधून ही माहिती दिली आहे. अन्य सॉफ्टवेअर कंपन्याही आपल्या एकूण कर्मचाऱयांपैकी 60 टक्के लोकांना घरातून काम करण्यास सांगितले आहे.









