एप्रिलमध्ये लागू होणार नवे नियम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीमुळे कार्यालयीन कार्यसंस्कृतीत मोठे बदल दिसून आले आहेत. संक्रमण रोखण्यासाठी कार्यालयांकडून वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली जात आहे. यांतर्गत कर्मचारी स्वतःचे काम घरातूनच करू शकतो. तर सरकार आता कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडण्याची संधी देणारे नियम लागू करण्याचा विचार करत आहे. कामगार मंत्रालयाने याकरता मसुदा प्रसिद्ध केला आहे. नव्या मसुद्यात उत्खनन, निर्मिती आणि सेवा क्षेत्राच्या कर्मचाऱयांना सामील केले जाणार आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला दिलासा
कामगार मंत्रालयाच्या वर्क फ्रॉम होम मसुदय़ानुसार माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला अनेक प्रकारचे दिलासे मिळू शकतात. या मसुदय़ात माहिती-तंत्रज्ञान कर्मचाऱयांना कार्यालयीन वेळेतही सूट मिळू शकते. कामगार मंत्रालयानुसार माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱया कर्मचाऱयांच्या सुरक्षेसाठीही मसुदय़ात तरतूद ठेवण्यात आली आहे. सेवा क्षेत्राच्या गरजेनुरुप पहिल्यांदाच वेगळे प्रारुप तयार करण्यात आले आहे.
मसुदय़ात अन्य सवलती
नव्या मसुदय़ात सर्व कामगारांसाठी रेल्वेप्रवासाच्या सुविधेचीही तरतूद ठेवण्यात आली आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ खाणक्षेत्राच्या कामगारांसाठी होती. तर नव्या मसुदय़ात शिस्तभंगाप्रकरणी शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.
सूचना मागविल्या
कामगार मंत्रालयाने न्यू इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड संबंधी सर्वसामान्यांकडून सूचना मागविल्या आहेत. 30 दिवसांमध्ये यासंबंधी सूचना करता येणार आहेत. हा कायदा एप्रिलमध्ये कामगार मंत्रालयाकडून लागू केला जाण्याची शक्यता आहे.









