वार्ताहर/ केळघर
वरोशी येथील कोरोनाबधित रुग्णाचा आज सकाळी कराड येथील कृष्णा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यामुळे जावली तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. तर वरोशी येथील बाधिताच्या पत्नीचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वरोशी गावाला प्रशासनाने याआधीच कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केल्याने वरोशी येथील दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत. गाव सील करण्यात आले असून गावाच्या वेशीवर पोलीसांचा बंदोबस्त असून गावात कुणालाही प्रवेश दिला जात नाही.
मुंबईहुन प्रवास करून 16 मेला (शनिवारी) बाधित व्यक्ती आली होती. कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने या व्यक्तीला 18 मेला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते. मंगळवारी रात्री उशिरा या व्यक्तीचा अहवाल पॉसिटीव्ह आल्याने बुधवारी प्रशासनाने गाव सील केले होते. अखेर उपचारदारम्यान शुक्रवारी पहाटे कराड येथे कृष्णा रुग्णालयात मधुमेह व श्वसनसंस्थेच्या तीव्र आजाराने या बधिताचा मृत्यू झाला. बधिताच्यावर कराड येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. बधिताच्या 52 वर्षीय पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वरोशी ग्रामस्थांच्या काळजात धस्स झाले असून बाधिताच्या अजून निकट सहवासित कुटुंबियांचे अहवाल प्रलंबित आहेत. वरोशी येथे दोन कोरोना बाधित सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
तालुक्यात पहिला बाधित निझरे येथे सापडला होता. तो कोरोनामुक्त झाला होता. मात्र वरोशी येथील बाधिताचा आज बळी गेल्याने जावली तालुक्यात पहिला कोरोनाचा बळी गेला आहे. वरोशी गाव कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने आरोग्य विभाग व आशा, अंगणवाडी सेविका यांच्यावतीने गावातील प्रत्येक घरात जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. वरोशी येथे बाहेरगावाहून आलेल्या 67कुटुंबाना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.