प्रतिनिधी / बेळगाव
जे पटत नाही, त्याला नाही म्हणण्याची क्षमता असायला हवी. आपला आतला आवाज हा मोठाच हवा. हे सर्वमान्य आहे. परंतु, प्रत्यक्षात खरेच असे आपल्याला वागता येते का? व्यवस्थेमुळे परिस्थितीमुळे आपल्या भवतालामुळे आज अनेक जणांची घुसमट होत आहे. ही घुसमट व्यक्त करणारा आणि भ्रष्टाचार केवळ आर्थिक क्षेत्रातच नसतो तर समाजाच्या विविध क्षेत्रात अगदी सांस्कृतिक क्षेत्रातही तो होत असतो, हे स्पष्ट करणारा एकपात्री प्रयोग अनिरुद्ध ठुसे यांनी सादर केला.
वरेरकर नाटय़ संघातर्फे शनिवारी के. बी. कुलकर्णी कला दालनात हा प्रयोग तसेच ‘मी टू-तू मी’ या एकांकिकेचे अभिवाचन करण्यात आले. ठुसे यांनी ‘माझे भ्रष्टाचाराचे दिवस’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. प्रयोगातील नायकाच्या ‘माझे भ्रष्टाचाराचे दिवस’ या कथेवर दिग्दर्शक चित्रपट काढण्याचे ठरवितो. परंतु, कथेत सतत बदल करून कथालेखकाचे स्वातंत्र्यच डावलतो. आपल्याला हवे तसे बदल करतो. त्यामुळे कथालेखकाला ही आपलीच कथा ना? असा प्रश्न पडतो. पैसे, प्रसिद्धी, नावलौकिक या प्रलोभनापोटी लेखक प्रथम होकार देतो. परंतु, आपल्या स्वातंत्र्यावरच गदा येत आहे, हे लक्षात घेऊन दिग्दर्शकाला तो ठाम नकार देतो. मात्र, असा नकार देऊन मी काय मिळविले? असा प्रश्न त्याला पडतो. यानंतर ‘मी टू आणि तू मी’ या एकांकिकेचे अभिवाचन करण्यात आले. विक्रम-वेताळ या पात्रांचा आधार घेत ही एकांकिका पुढे सरकते. वेताळ विक्रमाला ‘मी टू’ ही गोष्ट सांगतो. चित्रपट किंवा नाटय़सृष्टीत तरुण-तरुणींना काम देण्याच्या आमिषावर त्यांचे लैंगिक शोषण कसे होते? हे ‘मी टू’ या चळवळीने पुढे आणले आहे. त्यानंतर अनेक महिलांनी या चळवळीत सहभागी होत ‘मी टू’ला हॅशटॅग केले. ही एकांकिका याच प्रश्नावर भाष्य करते.
याचे अभिवाचन अनिरुद्ध ठुसे, जगदीश कुंटे, दीपक मराठे, योगिता हुंचीकट्टी, अंकिता कदम, जितेंद्र रेडेकर यांनी केले. दिग्दर्शन जगदीश कुंटे यांचे तर लेखन अनिरुद्ध ठुसे यांचे होते.
पहिल्या प्रयोगाचे संगीत अंकिता कदम यांचे तर अभिवाचनाचे संगीत नियोजन वर्षा बकरे यांचे होते. या दोन्ही प्रयोगांना प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला. आशयानुरुप दोन्ही विषय आजच्या काळाला अनुसरून आहेत, हे महत्त्वाचे. मात्र, वाचन करताना त्यातील चढउतार प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. एकसुरी वाचन प्रभावी ठरत नाही. पात्रांच्या भावभावना वाचनामध्ये उमटायला हव्यात. प्रेम, राग, संताप, तिरस्कार, उद्वेग, हतबलता या भावना आशयाला अनुसरून व्यक्त झाल्या तर वाचन प्रभावी ठरू शकते. या प्रयोगामुळे वरेरकर नाटय़ संघ पुन्हा कार्यरत झाला. दर महिन्याला विविध कार्यक्रम केले जातील, असे संघातर्फे जगदीश कुंटे यांनी सांगितले.









