प्रतिनिधी / वास्को
गेली सहा वर्षे रखडत राहिलेला वरूणापुरी ते मुरगाव बंदरपर्यंतचा चौपदरी महामार्ग येत्या गोवा मुक्ती दिनापर्यंत पूर्ण होणार असल्याचे मुरगावचे आमदार तथा गोव्याचे नगरविकासमंत्री मिलिंद नाईक म्हटले आहे. बायणा किनाऱयाचे दुसऱया टप्प्यातील सौदर्यीकरणही करण्यात येणार असून या महामागांचे काम पूर्ण झाल्यानंतर बायणा किनाऱयालाही नवीन झळाळी प्राप्त होणार असल्याचे नगरविकासमंत्र्यांनी म्हटले आहे.
बुधवारी बायणा किनारी छटपुजेनिमित्त भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री मिलिंद नाईक यांनी वरूणापुरी ते मुरगाव असा जमीनीवरील तसेच उड्डाण पुलाव्दारे तयार करण्यात आलेला चौपदरी महामार्ग काही अडचणीमुळे रखडला होता. मात्र, आता या महामार्गाचे काम पूर्ण क्षमतेने चाललेले असून येत्या 19 डिसेंबरला गोवा मुक्तीदिनापर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झालेले असेल. मुरगाव बंदरातील दोन धक्क्यांना हा महामार्ग जोडण्यात येणार आहे. नजीकच्या धक्क्याला हा महामार्ग जोडण्यात आल्यानंतर पुढील वर्षभराच्या काळात धक्का क्रमांक नऊलाही हा महामार्ग जोडण्यात येईल अशी माहिती मंत्री मिलिंद नाईक यांनी दिली. ऑक्टोबर 2015 साली वरूणापुरी ते मुरगाव बंदर असा पाच किलो मिटरहून अधिक अंतराचा हा चौपदरी महामार्ग तयार करण्याच्या कामाला प्रारंभ झाला होता. मात्र तांत्रीक अडचणी निर्माण झाल्याने या महामार्गाचे काम रखडले होते. हा महामार्ग मुरगाव बंदराला जोडण्याचे काम पूर्ण झाल्यास वास्को शहरातील बरीच वाहतुक कमी होणार आहे. पाचशे कोटी रूपयांचा हा प्रकल्प आहे. वरूणापुरी ते गांधीनगरपर्यंत जमीनीवरून तर काटे बायणा ते मुरगाव बंदरपर्यंत बायणाच्या किनाऱयावरून हा महामार्ग उड्डाण पुलाच्या स्वरूपात बांधण्यात आलेला आहे.
मंत्री मिलिंद नाईक यांनी यावेळी बोलताना बायणा किनाऱयाच्या पहिल्या टप्प्यातील सौदर्यीकरणानंतर लोक या किनाऱयाचा चांगल्यापैकी लाभ घेत आहेत. दुसऱया टप्प्यातील सौदर्यीकरणाच्या कामालाही प्रारंभ होणार आहे. उड्डाण पुलावर रोषणाई झाल्यानंतर किनाऱयाचेही सौंदर्य वाढेल असे मंत्री नाईक म्हणाले.
बायणातील शॅक्सचा प्रश्न सरकार सोडवणार, एमपीटीचा आक्षेप नाही
बायणा किनाऱयावरील शॅक्सच्या उभारणीला एमपीटीने आक्षेप घेतल्याने किनाऱयावरील व्यवसायीकांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र, या प्रश्नात आपण लक्ष घातलेले असून एमपीटी व सरकारमधील गैरसमजामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण पर्यटन संचालकांकडे चर्चा केलेली असून एमपीटीच्या कार्यक्षेत्रात बायणा तसेच अन्य काही किनारे येत असल्याने शॅक्समुळे निर्माण झालेला एमपीटीसंबंधीत प्रश्न सरकारतर्फे सोडवण्यात येईल असे मंत्री मिलिंद नाईक यांनी म्हटले आहे. दरम्यान, एमपीटीनेही शॅक्सप्रश्नी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. एमपीटीचे उपाध्यक्ष जी.पी. राय यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रीयेनुसार राज्य सरकारच्या उपक्रमांना किंवा पर्यटन उपक्रमांना एमपीटीचा कोणताही विरोध नाही. शॅक्स मालकांना परवाना घ्यावा लागेल व त्यासंबंधीचे शुल्क एमपीटीला द्यावे लागेल. एमपीटीचा शॅक्सना आक्षेप नाही असे उपाध्यक्ष राय यांनी म्हटले आहे.









