प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सर्वसामान्य माणसांना मदतीचा हात पुढे सरसावत आहेत. पण रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावातील दुर्गम अशा बादीवाडी व अवचितवाडीतील 35 कुटुंबांसाठी तेथील एक युवा सामाजिक कार्यकर्ता प्रथमेश गवाणकर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ासाठी अविश्रांत मेहनत घेतोय. त्या कुटुंबांना घराकडे जाण्यासाठी वाहतूकीची कोणतीही साधने नसल्याने या कोरोनाच्या संकटात त्याने 15 दिवसांच्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले आहे.
हातावर पोट घेऊन चालणारी अनेक कुटुंब आज भूकमारीने मरताना दिसत आहे. पण जी अनेक लोक भूकमारीने मरत आहेत, त्याकडे कोणाचेच लक्ष नाहीये. अनेक जण आता त्यांना मदतीचा हात देताना दिसत आहेत. हे खूप चांगलं आहेच. पण वरवडे गावातील बादीवाडीतील एक युवा सामाजिक कार्यकर्ता प्रथमेश गवाणकर हा गेली अनेक वर्षे सामाजिक काम करीत आहे.
याच वरवडे गावातील बादीवाडी आणि अवचितवाडी भागातील लोकांना अनेक वर्षे वरवडे गावातून वाडीत जाण्या येण्यासाठी पक्का रस्ता सोडा साधा कच्चा रस्ता सुद्धा नाही. आजही या वाडय़ांमधील एखादा माणूस आजारी पडला तर खांद्यावरून दवाखान्यात घेऊन जावे लागते. जाताना एक नदी पार करावी लागते. यातच अनेकजण वाहून सुद्धा गेले आहेत. दुर्दैवाने यात प्रथमेशच्या वडिलांचा देखील समावेश आहे. ही परिस्थिती असताना देखील आजही येथील लोकांना जमीनदार, खोत यांच्या पिळवणुकीला सामोरे जावे लागत आहे. का तर जमिनी या तेथील खोत मंडळींच्या आहेत. तसेच येथील अनेक लोक ही शासकीय योजनांपासून आजही वंचित आहेत.
या परिस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही वाडय़ातील 35 कुटुंबांना 15 दिवसांच्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.
प्रथमेश म्हणतो की, माझे आजोबा रत्नाकर गवाणकर, माझे वडील गोपाळ गवणाकर यांच्या पिढीपासून या व्यवस्थेसोबत आमचा लढा चालू आहे. माझ्या काळात मी वाडीतील लोकांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. प्रसंगी येथील प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन काम करावे लागत आहे. ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वरवडे येथील युवा सरपंच निखिल बोरकर यांचेही सहकार्य उत्तम पद्धतीने मिळत आहे. प्रथमेश गवाणकर या तरुणाची ही कार्यपद्धती अनेक तरुणांची प्रेरणा होताना दिसतेय.









